Join us

रंगनाथ पठारे यांना ‘विंदा करंदीकर जीवन गौरव’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 4:17 AM

ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराने गौरविण्यात येणार

मुंबई : राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या ‘विंदा करंदीकर जीवन गौरव पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना, तर श्री. पु. भागवत पुरस्कार श्रीरामपूर येथील शब्दालय प्रकाशन यांना जाहीर झाला आहे. याशिवाय, ज्येष्ठ समीक्षक डॉ. सुधीर रसाळ यांना मराठी भाषा अभ्यासक पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. कविवर्य मंगेश पाडगावकर मराठी भाषा संवर्धक पुरस्कार संजय जनार्दन भगत व मराठी साहित्य परिषद, आंध्रप्रदेश यांना घोषित करण्यात आला.मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी गुरुवारी या पुरस्कारांची घोषणा केली. २७ फेब्रुवारीला मराठी भाषा गौरवदिनी रवींद्र नाट्यमंदिर येथे आयोजित विशेष कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.प्रा. रंगनाथ पठारे यांनी राज्य सरकारने नेमलेल्या अभिजात मराठी भाषा समिती व अभिजात मराठी भाषा मसुदा उपसमितीचे अध्यक्ष, साहित्य अकादमी मराठी भाषा सल्लागार समिती, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य, वाङ्मय पुरस्कार निवड समित्यांचे अध्यक्ष व सदस्यपद भूषविलेले आहे.डॉ. सुधीर रसाळ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात गेली पस्तीस वर्षे मराठीचे अध्यापन करतात. गेली ६० वर्षे ते मराठी भाषा, मराठी वाङ्मय आणि मराठी संस्कृती या क्षेत्रात लेखन करत आहेत. श्रीरामपूरमधील शब्दालय प्रकाशन संस्थेने राज्यात अनेक ठिकाणी आणि गोव्यात पुस्तक प्रदर्शने भरवून साहित्य सेवा दिली. मराठी साहित्य परिषद, आंध्र प्रदेश ही संस्था प्रकाशन, चर्चासत्र, नियतकालिके अशा उपक्रमांतून नेहमीच कार्यरत आहे. तर शासनाचा परिभाषा कोश संगणकाच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेला सहज उपलब्ध व्हावा म्हणून संजय भगत यांनी विशेष कार्य केले आहे.