विनीत अग्रवाल यांची ईडीतून अवघ्या सव्वा दोन वर्षांत घरवापसी
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 06:46 AM2019-04-18T06:46:20+5:302019-04-18T06:46:31+5:30
विनीत अग्रवाल यांना तडकाफडकी हटविण्यात आल्यानंतर दक्षिण विभागाचे प्रमुख सुशील कुमार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे.
- जमीर काझी
मुंबई : सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) पश्चिम विभागाचे विशेष संचालक विनीत अग्रवाल यांना तडकाफडकी हटविण्यात आल्यानंतर दक्षिण विभागाचे प्रमुख सुशील कुमार यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. त्यामुळे कर्जबुडवे विजय माल्या, नीरव मोदी आदी महत्त्वाच्या प्रकरणांचा तपास आता त्यांच्या नेतृत्वाखालील पथकाकडून केला जाईल. केंद्रात नवीन सरकार स्थापन झाल्यानंतरच आता या पदावर पूर्णवेळ अधिकारी नेमला जाणार आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळाने अग्रवाल यांची जानेवारी २०१७ मध्ये ईडीच्या पश्चिम विभागाच्या प्रमुख पदी पाच वर्षांसाठी नियुक्ती केली होती. त्यांच्याकडे मुंबई, अहमदाबाद, पणजी विभाग तसेच नागपूर, रायपूर, सुरत व इंदूर उपविभागाचे कार्यक्षेत्र होते. त्यापूर्वी त्यांनी काही वर्षे केंद्रीय गुन्हा अन्वेषण शाखेत (सीबीआय) काम केले होते. गेल्या वर्षी हजारो कोटींचे कर्ज बुडवून देशातून फरार झालेल्या हिरे व्यापारी नीरव मोदी याला गेल्या महिन्यात लंडन पोलिसांनी अटक केली. त्याचे भारतात प्रत्यार्पण करण्यासाठी सहसंचालक सत्यब्राता कुमार हे २९ मार्चला लंडनला गेले होते. त्याचवेळी अग्रवाल यांनी त्यांची अन्यत्र बदली केली होती. मात्र त्यांना बदलीचे अधिकार नसल्याने ईडीचे संचालक संजय मिश्रा यांनी काही तासांमध्ये त्यांचा आदेश रद्द करीत कुमार यांना पूर्ववत पदावर कायम ठेवले. अग्रवाल यांची कृती अयोग्य, बेकायदेशीर असल्याने त्याबाबतचा अहवाल केंद्रीय नियुक्ती मंडळाकडे पाठविला होता. त्यानुसार मंगळवारी केंद्राने त्यांची मुदत कमी करीत त्यांना महाराष्टÑात पाठविण्याचा निर्णय घेतला. पश्चिम विभागाच्या विशेष संचालकपदावर नवीन अधिकाऱ्यांची नियुक्ती होईपर्यंत दक्षिण विभागाचे विशेष संचालक संजीव कुमार यांच्याकडे पदभार सोपविला आहे.
महाराष्टÑ केडरचे आयपीएस अधिकारी अग्रवाल यांची ५ वर्षांसाठी प्रतिनियुक्ती झाली असताना नीरव मोदी प्रकरणातील तपास अधिकाºयाला परस्पर हटविणे त्यांच्या अंगलट आले, त्यामुळे अवघ्या दोन वर्षे तीन महिन्यांत त्यांची मूळ महाराष्टÑ पोलीस दलात घरवापसी झाली,
अशी चर्चा ईडीसह आयपीएस अधिकाऱ्यांच्या वर्तुळात आहे.
>‘पोस्टिंग’साठी करावी लागेल प्रतीक्षा
विनीत अग्रवाल हे मूळचे उत्तर प्रदेशचे असून १९९४ च्या आयपीएस तुकडीचे अधिकारी आहेत. सीबीआयमध्ये प्रतिनियुक्तीवर काम केल्यानंतर त्यांनी मुंबईचे सहआयुक्त (प्रशासन), महाराष्टÑ परिवहन महामंडळ (एसटी) येथे मुख्य दक्षता अधिकारी म्हणून काम पाहिले. त्यानंतर ६ जानेवारी २०१७ पासून ईडीमध्ये त्यांची प्रतिनियुक्ती झाली होती. आता घरवापसी झाल्यानंतर महाराष्टÑातील ‘पोस्टिंग’साठी त्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे.
>वादग्रस्त ठरल्याने निवड
समितीने घेतला निर्णय
विनीत अग्रवाल यांची पाच वर्षांसाठी विशेष संचालक म्हणून नियुक्ती झाली असताना त्यांना अवघ्या दोन वर्षे तीन महिन्यांत माघारी परतण्याची नामुश्की आली आहे. वास्तविक विशेष संचालकांना साहाय्यक संचालक दर्जापर्यंतच्या अधिकाºयांच्या बदलीचे अधिकार असतात. अग्रवाल यांनी मात्र सहसंचालक सत्यब्राता कुमार यांच्याशी मतभेदानंतर ते लंडनमध्ये असतानाच परस्पर बदली केली. त्यामुळे ते वादग्रस्त ठरल्याने त्यांना मूळ घटकात पाठविण्याचा निर्णय निवड समितीने घेतला आहे.