तावडे पगार देतात अन् मी बदल्या करते, पंकजा मुंडेंची 'ताईगिरी'
By ऑनलाइन लोकमत | Published: December 25, 2018 03:48 PM2018-12-25T15:48:11+5:302018-12-25T15:50:09+5:30
मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला.
मुंबई - ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा आपल्या धडाकेबाज शैलीत शिक्षणमंत्री विनोद तावडेचं कौतुक केलं आहे. विनोद तावडे हे तारेवरची कसरत करत आहेत. त्यांच्या कामाची पद्धत पाहून मला दिवंगत नेते प्रमोद महाजनांची आठवण येते. शिक्षणमंत्री असल्याने ते शिक्षकांना पगार देतात, तर मी त्यांच्या बदल्यांचं काम करते, असे पंकजा मुंडेंनी म्हटले. त्यानंतर, सभागृहात हशा पिकला.
मुंबईतील सह्याद्री अतिथी गृहात महाराष्ट्र आंतरराष्ट्रीय शिक्षण मंडळाच्या शाळा उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला शिक्षणमंत्री विनोद तावडेंसह पंकजा मुंडे यांनाही बोलविण्यात आले होते. त्यावेळी, बोलताना पंकजा यांनी विनोद तावडेंचं कौतुक केलं. पण, आपलाही अधिकार सांगायला त्या विसरल्या नाहीत. विनोदजींनी 10 वीच्या मुलांचा व दफ्तराच्या ओझ्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला. यापूर्वी आपल्या शाळांना कुचेष्टेने आंतरराष्ट्रीय म्हणून बोलले जात होते. आता तो चांगल्या अर्थाने वापरला जाईल, असा आशावादही मुंडे यांनी व्यक्त केला. राज्यातील शालेय विद्यार्थ्यांचा कौशल्य विकास होणे, गरजेचं असून विकासकांमध्ये विनोद तावडे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे कायमच योगदान राहिले आहे, असेही त्या म्हणाल्या. पण, आंतरराष्ट्रीय शाळांमध्ये आमचा बीड जिल्हा नसल्याची खंतही पंकजा यांनी बोलून दाखवली.