शरद पवारांनी 'त्या' जातीसाठी काहीच केलं नाही, पण फडणवीस सरकारनं केलं - विनोद तावडे
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2019 03:40 PM2019-04-18T15:40:25+5:302019-04-18T16:22:33+5:30
'तुम्ही व्यक्ती म्हणून टीका करा. पण समूह, जात, समुदाय म्हणून टीका करु नका.'
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी जातीच्या आधारे महाराष्ट्रात राजकारण केले. मुख्यमंत्रीपद, मंत्रीपद स्वत: भूषविली, कुटुंबातील इतरांना पदे मिळवून दिली, पण 'त्या' जातीसाठी पवार यांनी काहीच केले नाही. जे केले ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने केले हे पवार यांनी लक्षात ठेवावे, असे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटले आहे.
शरद पवार यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीचा संदर्भ देत प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना विनोद तावडे यांनी आज सांगितले की, शरद पवार यांनी वृत्तपत्राच्या मुलाखतीत म्हटले आहे की, फडणवीसांची जात मी गेल्या पाच वर्षात कधी काढली ? पण शरद पवार बहुधा विसरले की, ज्यावेळी छत्रपती संभाजी राजे यांना नरेंद्र मोदी यांनी जेव्हा राज्यसभेवर खासदार म्हणून घेतले, त्यावेळी शरद पवार यांचे वक्तव्य होते की, जुन्या काळात छत्रपती फडणवीस नेमायचे, आता फडणवीस छत्रपतींना नेमायला लागले आहेत. त्यामुळे इतका विखारी जातीयवाद हा शाहु, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात शरद पवार यांच्यामुळेच पाहायला मिळाला आहे, अशी टीकाही विनोद तावडे यांनी केली. तरुणांना हे अजिबात आवडत नाही, विकासावरच राजकारण केले पाहिजे आणि प्रगतीवरच राजकारण केले पाहिजे, असा हा पुरोगामी छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र मानतो असेही त्यांनी सांगितले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कालच्या निवडणूक प्रचारसभेत स्पष्ट केले आहे की, राहुल गांधी आणि विरोधकांनी सगळयांनाच शिव्या द्यायला सुरुवात केली आहे. असे सांगतानाच विनोद तावडे म्हणाले की, 'तुम्ही व्यक्ती म्हणून टीका करा. पण समूह, जात, समुदाय म्हणून टीका करु नका.'
काल सुप्रिया सुळे व राहुल शेवाळे यांच्यामधील एक ऑडिओ क्लीप व्हाययरल झाली आहे, त्याबद्दल पत्रकारांनी प्रश्न विचारला असता तावडे म्हणाले की, "सुप्रिया सुळे यांनी अशा प्रकारचे वक्तव्य करायला नको होते. त्या अशा प्रकारचे वक्तव्य कधी करताना आपण ऐकलेले नाही, परंतु कधी कधी ज्यावेळी समोर पराभव दिसायला लागतो, तेव्हा भान राहत नाही आणि माणूस असा सैरावैरा वागायला लागतो".