Join us

मुंबई  विद्यापीठाचे निकाल 31 जुलैपर्यंत लागतील - विनोद तावडे 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2017 3:37 PM

मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांच्या निकालाला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते आहे. या साऱ्या शैक्षणिक गोंधळाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि शिक्षण मंत्रीच जबाबदार आहेत, त्यामुळे राज्यपालांनी तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

मुंबई, दि. 26 -  मुंबई विद्यापीठाच्या पदवी परीक्षांच्या निकालाला विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होते आहे. या साऱ्या शैक्षणिक गोंधळाला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू आणि शिक्षण मंत्रीच जबाबदार आहेत, त्यामुळे राज्यपालांनी तात्काळ त्यांचा राजीनामा घ्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे.  बुधवारीदेखील विधान परिषदेतही विरोधकांनी शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली. यावेळी पदवीचे निकाल 31 जुलैपर्यंत लागतील, असे आश्वासन विनोद तावडे यांनी दिलेत. शिवाय एकाही विद्यार्थ्याचं शैक्षणिक नुकसान होणार नाही, असेही ते म्हणालेत. 

विधान परिषदेतील घडामोडीदरम्यान, विधानपरिषदेत मुंबई विद्यापीठाकडून उत्तरपत्रिका तपासणीस झालेला विलंब या लक्ष्यवेधीवर बोलतांना आमदार नीलम गोऱ्हे यांनी विचारले की मेरीट ट्रॅक कंपनीला नोटीस दिली आहे त्या नोटीसचे स्वरूप काय आहे? यावेळी परीक्षा फेरतपासणीबाबत अधिक विद्यार्थी अर्ज करतील अशी शक्यता आहे. विद्यापीठ यासाठी ६०० रूपये फी घेते ते शुल्क आपण रद्द कराल का? युवा सेना नेते आदित्य ठाकरे यांनी ही मागणी केली आहे. त्याखेरीज कुलगुरूंकडून जे गैरकारभार झाला त्याची आपण चौकशी कराल  का? 

यावर शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी उत्तर दिले की, या फेरतपासणी मूल्य रद्द करण्याबाबत युवा व अभाविपने मागणी केली आहे. त्याचा सरकार नक्की विचार करेल. पूर्ण फेरतपासणी मूल्य रद्द करायचे की काही प्रमाणात याचा सरकार विचार करेल. कंपनीच्या नोटीसमध्ये सर्व दिरंगाईची कारणे विचारली आहे व उत्तर याचसाठी मागवले आहे की कंपनीस कोर्टात निर्णयावर पळवाट काढता येता कामा नये.