मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिला आहे. महायुतीच्या शिवाजीपार्क येथील सभेतही राज यांनी महायुतीला मतदान करण्याचे आवाहन केले. शुक्रवारी झालेल्या या सभेनंतर रविवारी प्रत्यक्ष मतदानाच्या आदल्या दिवशी पुन्हा एकदा भाजप नेते विनोद तावडे हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी पोहोचले. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात आले असले तरी ही भेट राजकीय असल्याच्या चर्चा रंगल्या.
पाचव्या टप्प्यातील मतदानात मुंबईसह ठाणे, नाशिक यासारख्या मतदारसंघात मराठी मते महत्त्वाची मानली जात आहेत. या मतदारसंघांमध्ये मनसेची ताकद आहे. या पार्श्वभूमीवर राज यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी महायुतीतील नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्या आहेत.
शुक्रवारी सभेआधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवतीर्थावर जात राज यांच्याशी चर्चा केली होती. त्याचप्रमाणे सर्व नेत्यांनंतर आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याआधी भाषण करण्याचा मान राज ठाकरे यांना देण्यात आला होता.
त्यानंतर रविवारी तावडे यांनी राज यांची भेट घेतली. ही भेट जेवणाच्या निमंत्रणापुरती मर्यादित असल्याचे सांगितले जात असले तरी मराठी मतांच्या बेरजेसाठी दोघांमध्ये चर्चा झाल्याचे समजते. तसेच विधानसभेत मनसेची काय भूमिका असेल यावरही या भेटीत चर्चा झाल्याचे समजते.