Join us

"एका कुटुंबाच्या हातात पक्षाचा निर्णय गेला की, पक्षाची, देशाची वाट लागते", विनोद तावडेंचा उद्धव ठाकरेंना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 7:25 PM

Vinod Tawade Criticize Uddhav Thackeray: शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे असते, तर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना कधीच गेली नसती.  पण एका कुटुंबाच्या हातात पक्षाचे सर्व निर्णय गेले की पक्षाची, देशाची वाट लागते हे आपण पाहिले, अशी बोचरी टीका भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद  तावडे यांनी केली.

मुंबई -  शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे असते, तर काँग्रेस राष्ट्रवादीसोबत शिवसेना कधीच गेली नसती.  पण एका कुटुंबाच्या हातात पक्षाचे सर्व निर्णय गेले की पक्षाची, देशाची वाट लागते हे आपण पाहिले, अशी बोचरी टीका भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद  तावडे यांनी केली. तर उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक यांनी तर मुंबईत असली कोण आणि नकी कोण, हे लवकरच मुंबईकरांना कळेल, अशा शब्दात जोरदार हल्लाबोल केला.

भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांच्या प्रयत्नातून पश्चिम दुतगती महामार्गानजीक कांदिवली येथे भारतरत्न माजी पंतप्रधान दिवंगत अटलबिहारी वाजपेयी यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे त्याचे अनावरण आज  भाजपाचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल राम नाईक, मुंबई भाजपाचे अध्यक्ष आमदार ॲड आशिष शेलार, मुंबई प्रभारी अतुल भातकळकर, विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, आमदार विजय भाई गिरकर, आमदार योगेश सागर, मनिषा चौधरी, सुनिल राणे आदींसह भाजपाचे पदाधिकारी  कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.  हा पुतळा उभारण्यासाठी आघाडी सरकारच्या काळात परवानगी देण्यात आली नाही त्यामुळे मोठा वाद निर्माण झाला होता. अखेर राज्यात युतीचे सरकार येताच पुतळा उभारण्याची परवानगी मिळाल्यानंतर आज अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मृती दिनाचे औचित्य साधून त्याचे अनावरण करण्यात आले. 

यावेळी विनोद तावडे म्हणाले की, ज्या काँग्रेसने राम मंदिराला विरोध केला, त्या काँग्रेस सोबत स्व. बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांची शिवसेना कधीच गेली नसती.  तर यावेळी बोलताना माजी राज्यपाल राम नाईक म्हणाले की, सर्वांशी मैत्री असूनही आपल्या मद्यावर  ठाम कसे रहावे  याचा आदर्श स्व अटलबिहारी वाजपेयी यांनी घालून दिला. आता मुंबई महापालिकेच्या निवडणुका आहेत. मुंबई आणि अटलबिहारी वाजपेयी यांचे एक नाते होते. त्यामुळे त्यांचा हा पुतळा या निवडणुकांमध्ये प्रेरणा देणाराच ठरणार आहे. आज त्यांच्या स्मृती दिनी पुतळयासमोर उभे राहून आपण सर्वांनी  संकल्प करु या, मुंबईचा महापौर आता भाजपाचाच होईल. त्यानंतर मुंबईकरांना ही कळेलच की, असली कोण आणि नकली कोण, असा जोरदार टोलाही त्यांनी लगावला. 

अटलजींचे मुंबईशी एक अनोखे नातेमुंबई अध्यक्ष भाजपा नेते आमदार ॲड आशिष शेलार यांनी आपल्या भाषणात अटल बिहारी वाजपेयी यांचे मुबईशी कसे नाते होते हे विषद करताना सांगितले की, दादरच्या शिवाजी मंदिर नाटयगृहात "वाहतो ही दुर्वांची जुडी" हे मराठी नाटक पाहणारे  देशाचे पहिले पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी होते तसेच दादरच्या प्लाझा मध्ये बसून  "हमाल दे धमाल" मराठी सिनेमाही पाहणारे ते एकमेव पंतप्रधान होते. मराठी माणसाचे आवडेते पकवान्न असलेली पुरणपोळी, मोदक सुध्दा अटलबिहारी वाजपेयी यांना आवडत असे. त्यांच्या पायावर शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली त्यावेळी सुध्दा ते अन्य कुठेही न जाता मुंबईच्या रुग्णालयात दाखल झाले होते. त्यामुळे  मुंबईवर प्रेम असणा-या अटलबिहारी वाजपेयी यांचे स्मारक देशभर  अन्य कुठेही होण्यापेक्षा ते मुंबईत होण्याचे एक आगळे महत्व आहे. हा संकल्प खासदार गोपाळ शेट्टी यांनी सोडला आणि तो पुर्ण केला. त्याबद्दल आमदार ॲड आशिष शेलार यांनी गोपाळ शेट्टी  यांचे अभिनंदन केले. यावेळी हा पुतळा उभारताना आघाडी सरकारच्या काळात आलेल्या अडचणी खा. गोपळा शेट्टी यांनी आपल्या भाषणात सांगितल्या तर आमदार योगेश सागर, अतुल भातकळकर यांचेही भाषण झाले. 

भाजपाचे माजी आमदार हेमेंद्र महेता शिवसेनेतून स्वगृही परतलेउत्तर मुंबईतील भाजपाचे माजी आमदार ॲड हेमेंद्र महेता यांनी मधल्या काळात शिवसेनेत प्रवेश केला होता. आज राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्या हस्ते त्यांचा पक्षप्रवेश करण्यात आला. यावेळी त्यांचे पुन्हा पक्षात जोरदार स्वागत करण्यात आले. तर आमदार ॲड आशिष शेलार यांची  मुंबई  अध्यक्षपदी नियुक्ती घोषीत झाली त्याच दिवशी काँग्रेसचे  मालाडचे माजी नगरसेवक बलदेव सिंग माणकू यांनीही भाजपामध्ये पक्षप्रवेश केला होता.

टॅग्स :विनोद तावडेउद्धव ठाकरेशिवसेनाभाजपा