ठाणे : शिक्षकांचे समायोजन, संस्थांपुढील आकृतीबंधाचे प्रश्न, शिक्षण सेवकांच्या समस्या सोडविण्यात शिक्षणमंत्री विनोद तावडे अपयशी ठरल्याचा मुद्दा उचलून धरत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शेकाप, शिक्षक भारती यांनी प्रचाराचा धडाका लावल्याने कोकण शिक्षक मतदारसंघात शैक्षणिक धोरणाचीच परीक्षा होणार आहे. कोकण पट्ट्यात दीर्घकाळ केलेल्या कामांमुळेच विनोद तावडे यांचे भाजपाच्या राजकारणात बस्तान बसले. त्यामुळे हा त्यांचा हुकमी परिसर मानला जातो. त्या अर्थाने त्यांची ही दुहेरी परीक्षा आहे.कोकण शिक्षक मतदारसंघात शिक्षक परिषदेचेच आजवर वर्चस्व होते. मात्र मागील निवडणुकीत विविध गटांनी एकत्र येत त्यांचे उमेदवार रामनाथ मोते यांची दमछाक केली होती. पसंतीक्रम मतदान पद्धत असल्याने, त्यातील पसंतीचे आकडे लिहिताना मते बाद होण्याचे प्रमाणही मोठे होते. यंदा मोते यांना उमेदवारी नाकारून परिषदेने वेणूनाथ कडू यांना संधी दिली आहे. मात्र मोते यांनी बंडखोरी केल्याने ते किती मतांचे नुकसान करतात, याची चिंता भाजपाच्या धुरिणांना लागली आहे. त्यातच शिक्षक भारतीने अशोक बेलसरे या जाणत्या आणि मागील निवडणुकीत सर्वांनी एकत्रितपणे रिंगणात उतरवून आव्हान उभ्या केलेल्या अनुभवी उमेदवारालाच पुन्हा रिंगणात उतरविले आहे. शिक्षक सेना आणि मुख्याध्यापक संघटनेच्या कामाच्या बळावर गेले सहा महिने आखणी करणारे ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या पाठीशी आपली ताकद उभी करत शिवसेनेनेही आव्हान उभे केले आहे. त्यातच ज्या रायगड जिल्ह्यातून कडू उभे आहेत तेथील शैक्षणिक संस्थांच्या बळावर शेकापने बाळाराम पाटील यांना संधी दिली आहे. त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा आहे. केदार जोशी या अपक्ष उमेदवारानी शिक्षकांच्या आत्मसन्मानाचा मुद्दा प्रचारात अग्रक्रमाने आणला असून त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे अशोक बहिरव, केदार जोशी, महादेव सुळे, नरसू पाटील, मिलिंद कांबळे यांच्यासह दहा उमेदवार रिंगणात असले तरी या पाच उमेदवारांतच खरी लढत आहे. त्यातही कोणता उमेदवार कोणत्या पक्षाची किती मते फोडतो, यावर सर्व गणिते अवलंबून आहेत.मागील वेळेपेक्षा अधिक तयारीने शिक्षक भारती अशोक बेलसरे यांच्या पाठीशी आहे. शिवसेनेची ताकद ज्ञानेश्वर म्हात्रे यांच्या मागे आहे. बाळाराम पाटील आणि रामनाथ मोते आपापल्या पाठिराख्यांची किती मते जमवू शकतात त्यावर सारे चित्र ठरणार आहे. (विशेष प्रतिनिधी)शैक्षणिक धोरण हेच टीकेचे लक्ष्य- ‘शिक्षकांचे प्रश्न मांडताना सर्व उमेदवारांनी शैक्षणिक धोरण टीकेचे लक्ष्य केल्याने ही निवडणूक एकप्रकारे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या धोरणावरील शिक्षकांची प्रतिक्रिया असेल.‘त्यामुळे कोकण पट्ट्यातील भाजपाचे मंत्री, खासदार, आमदार, नगरसेवक आपापल्या भागातील प्रचारात गुंतले आहेत. त्यामुळे शिवसेनेनेही तेवढ्याच ताकदीने आपले नेतेही उतरविले आहेत.युतीतील फाटाफुटीनंतर या निवडणुकीतही हे दोन्ही पक्ष आमनेसामने उभे ठाकले आहेत. राजकीय पक्षांच्या थेट सहभागामुळे दीर्घकाळानंतर ही निवडणूक रंगतदार बनली.
विनोद तावडेंच्या ‘शिक्षणा’ची उद्या परीक्षा
By admin | Published: February 01, 2017 2:19 AM