Join us

नियम उल्लंघन करून रेल्वे प्रवास पडला महागात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 4:06 AM

मुंबई : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. मात्र, काहीजण तिकीट किंवा बनावट ...

मुंबई : मुंबईत कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्याने अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा आहे. मात्र, काहीजण तिकीट किंवा बनावट कागदपत्रे बनवून रेल्वे प्रवास करीत आहेत. मुंबईतील मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने अशाच प्रकारच्या प्रवाशांवर कारवाईचा वेग वाढविला आहे. दोन महिन्यांत सुमारे ७५ हजार लोकांवर कारवाई केली आहे. या कारवाईत रेल्वेने कोट्यवधी रुपयांचा दंडही वसूल केला आहे.

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार म्हणाले की, १ एप्रिल ते ३१ मे या कालावधीत अवैधरीत्या प्रवास करणाऱ्या एकूण ७५ हजार ७९३ प्रवाशांवर आम्ही कारवाई केली आहे. या कारवाईद्वारे रेल्वेने ३ कोटी ९७ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. १४ एप्रिलपासून सर्वसामान्यांना रेल्वेने प्रवास करण्याची परवानगी नव्हती आणि त्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकलने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

यासह १७ एप्रिल ते २१ मे या कालावधीत १०६१ प्रवाशांवर विनामास्क प्रवास केल्याबद्दल कारवाई करण्यात आली आहे. रेल्वेच्या अधिकृत आकडेवारीनुसार ८०८ प्रवासी पकडले गेले होते जे बनावट ओळखपत्र बनवून रेल्वेमध्ये प्रवास करीत होते. अशा प्रत्येक प्रवाशांकडून ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला. तपासादरम्यान असेही आढळले आहे की बनावट आयकार्ड बनविणारे बहुतेक प्रवासी बीएमसीचे नाव वापरत होते.