मुंबई - देशात आणि राज्यात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असून गेल्या काही दिवसांपासून राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागावाटपावरुन रस्सीखेच आणि तंटा पाहायला मिळत आहे. दुसरीकडे आरोप प्रत्यारोपांच्या फैरीही झडत आहेत. त्यातच, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय जनता पक्ष यांच्याविरुद्ध आचारसंहिता भंग केल्याचा आरोप करत निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. लोकप्रतिनिधी कायदा आणि आदर्श आचारसंहितेचं उल्लंघनाबाबत केल्याचं राशपने आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटलं आहे.
शिवसेना (एकनाथ शिंदे) आणि भारतीय जनता पक्ष या दोन्ही पक्षांनी त्यांच्या स्टार प्रचारक यादीचा भाग म्हणून इतर राजकीय पक्षांमधील विविध व्यक्तींची नावे प्रसिद्ध केली आहेत, जी लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम ७७ चे उल्लंघन करणारी आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने निदर्शनास आणून दिले आहे. तसेच, शिवसेनेने (एकनाथ शिंदे) पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री इत्यादी उच्च सार्वजनिक पदावर असलेल्या विविध लोकांची नावे प्रसिद्ध केली आहेत. हे केवळ नियमांचे उल्लंघन नाही. तर, लोकप्रतिनिधी कायदा, परंतु केंद्र किंवा राज्यात सत्तेत असलेल्या पक्षाचे प्रतिनिधी आदर्श आचारसंहिता भंग करत आहेत. निवडणूक प्रचाराच्या उद्देशाने या महत्वाच्या पदांच्या व्यक्तींकडून आपल्या पदांचा गैरवापर होत असल्याचंही राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने म्हटले आहे.
भारत देशातील राष्ट्रयी निवडणूक आयोग मुक्त आणि निष्पक्ष निवडणुकांच्या पावित्र्याचे रक्षण करण्यासाठी संबंधित तक्रारीची दखल घेऊन कठोर कारवाई करेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे, असेही राष्ट्रवादीने पत्रात म्हटले आहे. एनसीपी शरदचंद्र पवार पक्षाने ट्विट करुन पत्रही शेअर केले आहे. महत्त्वाच्या पदसिद्ध नेत्यांची नावे लिहिली आहेत. देशाचें पंतप्रधान, मुख्यमंत्री, केंद्रीयमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या नावांवर राष्ट्रवादीने आक्षेप घेत आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.