Join us  

मनोरीत सीआरझेड कायद्याचे उल्लंघन; मुख्यमंत्र्यांकडे केली तक्रार

By जयंत होवाळ | Published: June 18, 2024 6:43 PM

सीआरझेड क्षेत्रात समुद्राच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला  अडथळा येईल अशी बांधकामे , पूल, किंवा घाट बांधणे  किंवा अन्य बांधकामे करता येत नाहीत.

मुंबई : मनोरी येथे सीआरझेड कायद्याचे उल्लंघन  करून भराव टाकण्याचे काम होत असल्याचे उजेडात आले आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री तसेच  सीआरझेड प्राधिकरणाकडे तक्रार करण्यात आली आहे.

६ जानेवारी २०११ साली सीआरझेडची अधिसूचना प्रकाशित करण्यात आली. त्यातील अधिनियमाचे उल्लंघन  करून भराव टाकला जात आहे. सीआरझेड क्षेत्रात समुद्राच्या पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहाला  अडथळा येईल अशी बांधकामे , पूल, किंवा घाट बांधणे  किंवा अन्य बांधकामे करता येत नाहीत. त्याशिवाय स्टीलच्या लोखंडी पट्ट्या टाकून तात्पुरता  रस्ताही तयार करता येत  नाही. किनाऱ्याची धूप जाऊ नये यादृष्टीने सीआरझेड कायद्यात नियम स्पष्ट करण्यात आले आहेत. किनाऱ्यावरील वाळूचे प्रमाण कमी होईल यादृष्टीने काहीही काम करता येत नाही. फक्त संरक्षणाच्या दृष्टीने काही बाबी  आवश्यक असतील तर त्या करता येतात . जलवाहतुकीच्या दृष्टीने जेट्टी बांधणे  , बंदरांची उभारणी, यासाठी नियमांच्या अधीन राहून कार्यवाही करता येते.

मात्र जून महिना सुरु झाल्यापासून मनोरीच्या  समुद्रकिनाऱ्यावर डेब्रिजचे मोठे ढीग दिसून येऊ लागले आहे, तर काही ठिकाणी कच्ची बांधकामे होत असल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले. या भागात पावसाळ्यात स्थानिक मच्छीमारांच्या बोटी नांगरलेल्या असतात. वॉचडॉग फाउंडेशनने या भागाची पाहणी केली असता गावकऱ्यांच्या तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आले. त्यांनी या भागाचे चित्रीकरण केले आहे. तसेच छायाचित्रेही काढली आहेत. त्याआधारे संबंधित विभागांकडे तक्रार करण्यात आली आहे.