आश्चर्यजनक... वाहतूक नियमांचे उल्लंघन केले पुण्यात, दंड आकारला मुंबईत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2022 06:41 AM2022-05-22T06:41:11+5:302022-05-22T06:42:48+5:30
अनोळखी व्यक्तीकडून बनावट वाहन क्रमांकाद्वारे फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच फास्ट टॅग कंपनीकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली.
मुंबई : बनावट वाहन क्रमांकाचा फटका फास्ट टॅग कंपनीला आणि संबंधित वाहन चालकाला बसल्याची घटना मुंबईच्या कांजूरमार्ग येथे घडली. वाहन मुंबईत असतानाही पुण्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी फास्ट टॅगमधून पैसे कट झाल्याचा प्रकार समोर आला.
अनोळखी व्यक्तीकडून बनावट वाहन क्रमांकाद्वारे फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच फास्ट टॅग कंपनीकडून पोलिसांत तक्रार देण्यात आली. याप्रकरणी कांजूर मार्ग पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाच्या अधिक चौकशीत यापूर्वी पुण्यासह सातारा आणि रायगडमध्ये वाहतुकीचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारण्यात आल्याचे समोर आले. उदय शंकर व्यवहारे (४२) यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उदय यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते एका खासगी कंपनीत व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत.
कंपनीच्या कामकाजाकरिता वापरण्यात येणारे वाहन मुंबईत असतानाही पुण्यात वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी दंड आकारण्यात येत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. तसेच, फ़ास्ट टॅगमधून दंडाचे पैसे जात असल्याचे त्यांना आढळून आले. त्यामुळे त्यांनी आतापर्यंत आलेल्या दंडाच्या रकमेबाबत चौकशी केली. तेव्हा, फास्ट टॅगच्या माध्यमातून रायगड, सातारा, कल्याण भागातही दंड आकारण्यात आल्याचे उघड झाले.