मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या आरोग्य पायाभूत कक्षाद्वारे जी.टी.बी.नगर रेल्वे स्टेशनजवळील सायन विभागातील सी.एस. क्रमांक ११ येथील सायन रुग्णालयासाठी सायन कोळीवाडा महानगरपालिका कर्मचारी वसाहतीच्या (एफ/उत्तर विभाग) पुनर्बांधणीकरिता निविदा मागविण्यात आल्या आहेत. या निविदेत नियमांचे उल्लंघन झाले असल्याचा आरोप शिवसेना आमदार सुनील प्रभू यांनी पत्राद्वारे पालिका आयुक्तांकडे केला आहे.नियम उल्लंघन झाल्यामुळे ही निविदादेखील रद्द करून नव्याने निविदा मागवाव्यात. तसेच या प्रकरणीही अधिकाऱ्यंविरोधात चौकशी करावी, अशी मागणी प्रभू यांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. त्यामुळे महानगरपालिकेचा फायदा होईल मुंबईकरांच्या खिशातून जमा केलेला कररूपी पैसा वाचेल, असा विश्वास त्यांनी प्रभू यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.‘मानक निविदा दस्तावेज’मध्ये संयुक्त उपक्रमाबाबत विस्तृत विश्लेषण असून, १०० कोटी आणि त्यावरील कामाकरिता संयुक्त उपक्रम लागू आहे, तसेच या निविदेमध्ये संयुक्त उपक्रम लागू आहे की नाही, याबाबत उल्लेख नसल्याने ‘मानक निविदा दस्तावेज’ अनुसार संयुक्त उपक्रम लागू होतो. परंतु याबाबत आरोग्य पायाभूत सुविधा कक्षाद्वारे आयोजित निविदा पूर्व बैठकीत झालेल्या चर्चेनुसार शुद्धिपत्रक काढण्यात आले. या शुद्धिपत्रकात दिलेल्या बाब क्रमांक १ मध्ये संयुक्त उपक्रम अनुज्ञेय नाही, असे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. या शुद्धिपत्रकानुसार ठराविक कंत्राटदारांना मदत करण्यासाठी व स्पर्धा कमी करण्यासाठी जाचक अटी अंतर्भूत करण्यात आल्या आहेत, हे स्पष्ट दिसत असल्याचे आमदार प्रभू यांनी म्हटले आहे.
महापालिका वसाहतीच्या पुनर्बांधणीत नियमांचे उल्लंघन?
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2020 1:49 AM