Join us

नदीतील गाळ काढण्याच्या कामात नियमांचे उल्लंघन!

By admin | Published: June 10, 2015 10:33 PM

महाड तालुक्यातील काळ नदीपात्रातील गाळ उपसण्याचे काम कोलाड लघुपाटबंधारे विभागामार्फत सुरु करण्यात आले आहे

बिरवाडी : महाड तालुक्यातील काळ नदीपात्रातील गाळ उपसण्याचे काम कोलाड लघुपाटबंधारे विभागामार्फत सुरु करण्यात आले आहे. या कामाकरिता महाराष्ट्र शासनाकडून ३८ लाखांचा निधी खर्च करण्यात येत आहे. मात्र काढलेला गाळ नदीपात्रातच टाकून भराव केला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत होती. बिरवाडी स्मशानभूमीलगत असलेल्या खड्ड्यामध्ये नदीपात्रातील गाळ टाकला जात असल्याचे वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर लघुपाटबंधारे विभागाचे स्थापत्य विभाग अभियांत्रिकी सहाय्यक सूर्यकांत बिरकर यांनी सरपंच लक्ष्मण पवार यांच्या सांगण्यावरूनच गाळ त्या ठिकाणी टाकला जात असल्याचे स्पष्ट केले होते. माणगांवमधील वाकडाई ट्रान्स्पोर्ट कन्स्ट्रक्शन यांना गाळ काढण्याचा ठेका देण्यात आला आहे. काळ नदीतील गाळ काढताना नियमांचे उल्लंघन होत असल्याचेही समोर येत आहे. नदीतील दगड, माती, वाळू, मिश्रित गाळ परिसरात अवैधरित्या घेऊन टाकला जात आहे. याशिवाय काळ नदीत अवैधरित्या वाळूचा व्यवसाय असल्याने नागरिकांमध्ये नाराजी आहे. या कामावर देखरेख ठेवण्याचे काम लघुपाटबंधारे विभागातील अधिकाऱ्यांचे आहे. मात्र त्यांनी ठेकेदाराला विशेष सूट दिल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. (वार्ताहर)