बाजार समितीकडून सुरक्षा नियमांचे उल्लंघन
By admin | Published: November 24, 2014 01:24 AM2014-11-24T01:24:46+5:302014-11-24T01:24:46+5:30
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन बाजारपेठांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याने फळ, भाजीसह इतर मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
नामदेव मोरे, नवी मुंबई
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासन बाजारपेठांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्याने फळ, भाजीसह इतर मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. पोलिसांनी सुरक्षाविषयी दहापेक्षा जास्त पत्रे दिली असून प्रशासनाने सर्व पत्रांना केराची टोपली दाखवली, ज्यामुळे मार्केटच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
एपीएमसी पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रामध्ये नशेसाठी क्रिस्टल मेथ हे नशेचे औषध विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी नुकताच गजाआड केले. हे आरोपी या परिसरात व मार्केटमधील कामगारांना हे नशेचे पदार्थ विकत असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही महिन्यांपूर्वी मार्केटमध्ये गांजा विकणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली होती. यापूर्वी अनेक वेळा चोरी, खून प्रकरणांमधील आरोपींनी फळ मार्केटमध्ये आश्रय घेतल्याचे उघडकीस आले होते. अनेक बांगलादेशी नागरिकांना येथून अटक करण्यात आली.
फळ मार्केटमधील मध्यवर्ती सुविधागृह इमारतीमधील पथसंस्थांमध्ये दोन वेळा चोरी झाली असून, एकवेळ कामगारावर हल्लाही झाला होता. समिती प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच येथील मार्केट परिसर गुन्हेगारांचे आश्रयस्थान बनू लागले आहे. फळ व भाजी मार्केटमध्ये एक हजारपेक्षा जास्त परप्रांतीय कामगार विनापरवाना वास्तव्य करीत आहेत. त्यांची नोंद कोणाकडेही नाही. नियमाप्रमाणे येथे काम करणाऱ्या प्रत्येकाकडे एपीएमसीचा परवाना असणे आवश्यक आहे. परंतु व्यापाऱ्यांपासून सर्वच या समस्येकडे दुर्लक्ष करीत आहेत.
बाजारपेठांमध्ये अनधिकृतपणे फळ व इतर वस्तूंची किरकोळ विक्री करणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. या विक्रेत्यांकडेही दुर्लक्ष केले जात आहे. रात्री १०० पेक्षा जास्त वाहने अनधिकृतपणे उभी केली जात आहे. सुरक्षारक्षक व प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या परवानगीनेच हे प्रकार सुरू आहेत. एपीएमसी पोलीस स्टेशनने मागील वर्षभरात जवळपास १० पत्रे दिली आहेत.
मार्केटमध्ये प्रवेश करणाऱ्या सर्वांकडे ओळखपत्र असावे. कॅन्टीन वेळेवर बंद करणे, गाळ्यांमध्ये अनधिकृत कॅन्टीन सुरू करू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु या सर्व सूचनांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे मार्केटला धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे.