Join us

रेल्वे प्रशासनाकडून सोशल डिस्टन्सचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2020 7:06 PM

एकत्र गटाने रेल्वे कर्मचाऱ्यांना करावे लागत आहे काम; कोरोनाचा प्रसार होण्याची भीती

मुंबई : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये , यासाठी सर्व स्तरातून प्रयत्न केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल डिस्टन्स ठेवण्याच्या सुचना दिल्या आहेत. मात्र मध्य रेल्वे प्रशासनकडून याचे सर्रासपणे उल्लंघन केले जात असल्याचे दिसून येत आहे. रेल्वे मार्गावरील अनेक ठिकाणी रुळांची दुरुस्ती करणे, ओव्हर हेड वायरची दुरुस्ती करणे सुरू आहे. मात्र यामध्ये सर्व रेल्वे कर्मचाऱ्यांना एकत्र येऊन काम करावे लागत आहे. यासह अनेक कर्मचाऱ्यांना मास्क, सॅनिटायझर दिली जात नसल्याने कोरोना होण्याचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे. 

कोरोना विषाणूची बाधा टाळण्यासाठी देशात  24 मार्चपासून लाॅकडाऊन करण्यात आले आहे. नागरिकांनी गर्दी टाळण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र, मध्य रेल्वे मार्गावर ठाणे, कुर्ला येथे रेल्वे रुळांचे दुरुस्तीचे काम सुरु आहे. दिवा-वसई यामार्गावरील मालजीपाडा येथे देखील मजुरांकडून रेल्वेचे काम करून घेतले जात आहे. मात्र, त्याच्या सुरक्षेची कोणतीही काळजी घेतली जात नाही. 7 ते 10 रेल्वे कर्मचारी एकत्र येऊन काम करत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची भीती आहे.  

कोरोनाचा संसर्ग हा मानवाद्वारे होतो. त्यामुळे खूप झपाट्यानी पसरतो. या कोरोनाची भीती रेल्वे कर्मचाऱ्यांचा मनात आहेत. मात्र अत्यावश्यक सेवेत काम करत रेल्वे कर्मचारी जीवाची बाजी लावत आहेत. अशा रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेची जबाबदारी रेल्वेनी घ्यावीत. कर्तव्यावर असलेल्या रेल्वे कर्मचाऱ्यांना हँन्ड ग्लोज, सॅनिटायझर आणि मास्क पुरविण्यात यावेत. रेल्वे कर्मचाऱ्यांनी सोशल डिस्टंसिंग पाळावेत. जे पाळत नसेल अशा रेल्वे अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश रेल्वे मंडळाने काढावेत, अशी प्रतिक्रिया सेंट्रल रेल्वे मजदूर संघाचे उपाध्यक्ष अमित भटनागर यांनी दिली.

टॅग्स :रेल्वेकोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरसमुंबई