ईदकाळात ध्वनिप्रदूषण नियमांचे उल्लंघन- हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 05:53 AM2018-12-14T05:53:04+5:302018-12-14T05:53:22+5:30
ईद-मिलाद-उन-नबी साजरी करताना मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले, अशी माहिती आवाज फाउंडेशन या एनजीओने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली.
मुंबई: ईद-मिलाद-उन-नबी साजरी करताना मोठ्या प्रमाणावर ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले, अशी माहिती आवाज फाउंडेशन या एनजीओने उच्च न्यायालयाला गुरुवारी दिली. त्यावर उच्च न्यायालयाने यासंदर्भात राज्य सरकारला उत्तर देण्याचे निर्देश दिले.
न्या.अभय ओक व न्या. संदीप शिंदे यांनी राज्य सरकारला दोन आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे धार्मिक उत्सव काळात सर्रास उल्लंघन होते. राज्य सरकारला या नियमांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल आहेत. त्यात आवाज फाउंडेशननेही जनहित याचिका दाखल केली आहे.
ईददरम्यान क्रॉफर्ड मार्केट, भायखळा, माझगाव येथे ध्वनिप्रदूषण नियमांचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाले, असे फाउंडेशनने सांगितले. नियमांनुसार, रहिवासी व शांतता क्षेत्रात दिवसा आवाजाची कमाल पातळी ५० ते ५५ तर, रात्री ४० ते ४५ डेसबिल दरम्यान हवी. २१ नोव्हेंबरला क्रॉफर्ड मार्केट, भायखळा, माझगाव येथे आवाजाची पातळी ८८ ते १०५ डेसिबल होती.