Join us

प्रदूषणाचे नियम मोडणाऱ्यांवर उगारणार कारवाईचा बडगा; कारवाईसाठी स्वतंत्र विभाग

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2024 10:24 AM

आयुक्तांची मंजुरी बाकी. 

मुंबई : मुंबई महापालिकेत आता स्वतंत्र पर्यावरण आणि क्लायमेट चेंज विभाग सुरू करण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये समन्वयासाठी एक सब इंजिनियर नेमण्यात येणार असून, चीफ इंजिनिअरसह आवश्यक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जाणार आहे. याबाबतचा प्रस्तावाला उपायुक्त स्तरावर मंजुरी मिळाली असून, आयुक्तांच्या मंजुरीनंतर तातडीने या विभागाचे काम सुरू होणार आहे. 

पालिकेत २००५ मध्ये उपायुक्त पर्यावरण आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग तयार झाले, तर २०१६ पर्यंत पालिकेचा पर्यावरण विभाग आणि घनकचरा व्यवस्थापन विभाग एकाच उपायुक्ताच्या माध्यमातून काम करीत होते. मात्र २०१६ मध्ये या विभागाचे विभाजन झाल्यानंतर स्वतंत्र उपायुक्त नेमण्यात आले. मात्र दोन्ही विभागांच्या अंतर्गत असणाऱ्या कर्मचाऱ्यांपैकी पर्यावरण विभागाला एकही कर्मचारी देण्यात आला नाही, तर सुमारे ४० हजार कर्मचारी घनकचरा व्यवस्थापन विभाग उपायुक्तांच्या अखत्यारीत समाविष्ट करण्यात आले. 

पर्यावरण विभागाची जबाबदारी वाढली पर्यावरणाच्या संवर्धनासाठी पालिकेचा पर्यावरण विभाग महत्त्वाची जबाबदारी पार पाडत आहे; मात्र पालिकेच्या पर्यावरण विभागाची भिस्त एकाच अधिकाऱ्यावर असल्याची माहिती समोर आली आहे. पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्याकडे एक क्लार्क असून, अन्य स्टाफ घनकचरा व्यवस्थापन विभागातील आहे. त्यामुळे पर्यावरणाच्या संवर्धनासाठी झटणाऱ्या पर्यावरण विभागच कामाच्या तणावाखाली असल्याने मुंबई प्रदूषणमुक्त होणार कसा? असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे. 

असे असणार मनुष्यबळ :

    पर्यावरण विभागाचा एक चिफ इंजिनियर.

    दोन डेप्युटी चिफ इंजिनिअर.

    तीन एक्झ्युकिटिव्ह इंजिनिअर.

    सातही झोनसाठी असिस्टंट इंजिनिअर.

    समन्वयासाठी वॉर्डमध्ये सब इंजिनिअर.

नियम मोडणाऱ्यावर विभागाचे लक्ष :

प्रदूषण नियंत्रणासाठी विभागवार तपासणी करून कारवाई सुरू आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या विभागाच्या माध्यमातून चालणाऱ्या कामांमध्ये पर्यावरण रक्षणासाठी आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात येईल. 

टॅग्स :मुंबईनगर पालिका