Join us

बंगालमधील हिंसाचाराचा रा. स्व. संघाकडून निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 08, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : बंगालमधील निवडणूक निकालानंतर उसळलेल्या हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र निषेध केला. हा प्रकार पूर्वनियोजित ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : बंगालमधील निवडणूक निकालानंतर उसळलेल्या हिंसाचाराचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तीव्र निषेध केला. हा प्रकार पूर्वनियोजित असून त्यामुळे अनुसूचित जाती-जमातींतील नागरिकांसोबतच हजारो लोक बेघर झाले. प्राण आणि अब्रूच्या रक्षणासाठी सुरक्षित ठिकाणांच्या शोधात विस्थापित होण्याची वेळ लोकांवर आल्याचे संघाचे सरकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

बंगालमधील हिंसाचार हा भारतीय संविधानातील एकात्मतेच्या व लोकशाहीच्या मूलभूत भावनेलाच छेद देणारा आहे. या पाशवी हिंसाचारात शासन आणि प्रशासनाने मूकदर्शकाची भूमिका घेतली आहे. सरकार कोणाचेही असो समाजात शांतता प्रस्थापित करणे, तसेच गुन्हेगारी घटकांमध्ये जरब निर्माण करणे आणि हिंसक कारवाया करणाऱ्यांना शिक्षा करणे, ही त्यांची प्राथमिक जबाबदारी असते, असे होसबळे यांनी आपल्या निवेदनात म्हटले आहे.

निवडणुका पक्ष जिंकतात, पण निवडून आलेले सरकार संपूर्ण समाजाला उत्तरदायी असते, असे सांगतानाच ममता बॅनर्जी यांच्या नवनिर्वाचित सरकारने तातडीने हिंसाचार आटोक्यात आणून कायद्याचे राज्य प्रस्थापित करावे. दोषी व्यक्तींना तातडीने जेरबंद करून त्यांच्यावरील कारवाई करावी. पीडितांच्या मनात विश्वास आणि सुरक्षिततेचा भाव निर्माण करून त्यांच्या पुनर्वसनाची व्यवस्था करण्याला प्राधान्य द्यावे, असे सांगतानाच आम्ही केंद्र सरकारने बंगालमध्ये शांतता प्रस्थापित करण्याकरिता शक्य असलेली प्रत्येक गोष्ट त्यांनी करावी तसेच, राज्य सरकारलाही या संदर्भात कारवाई करण्यास भाग पाडावे, असे आवाहनही संघाने केले आहे.

..............................