संभाजी भिडेंविरोधात आम्ही दिलेले पुरावे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सादर करावेतः प्रकाश आंबेडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2018 03:51 PM2018-03-27T15:51:42+5:302018-03-27T15:55:44+5:30
संभाजी भिडे यांच्यावर चिथावणी केल्याचा आरोप केला आहे. संभाजी भिडे यांच्या सांगण्यावरुनच त्याठिकाणी हिंसाचार उसळला. तसेच, त्याठिकाणी दगडफेड करणारे संभाजी भिडे यांच्या घोषणा देत होते. याचबरोबर, या प्रकारणात संभाजी भिडे यांची चौकशी व्हावी, हीच आमची मागणी असणार आहे, असेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.
मुंबई : कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणात संभाजी भिडे यांचा प्रत्यक्षात सहभाग नसला, तरी त्यांच्या चिथावणीमुळे ही घटना घडल्याचे भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी म्हटले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत कोरेगाव-भीमा हिंचारप्रकरणी संभाजी भिडे यांना मंगळवारी क्लीन चिट दिली. त्यानंतर प्रकाश आंबेडकरांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी संभाजी भिडे यांच्यावर चिथावणी केल्याचा आरोप केला आहे. संभाजी भिडे यांच्या सांगण्यावरुनच त्याठिकाणी हिंसाचार उसळला. तसेच, त्याठिकाणी दगडफेड करणारे संभाजी भिडे यांच्या घोषणा देत होते. याचबरोबर, या प्रकारणात संभाजी भिडे यांची चौकशी व्हावी, हीच आमची मागणी असणार आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांना जे पुरावे दिले होते. ते पुरावे मुख्यमंत्र्यांनी सभागृहात सादर करावे असेही यावेळी प्रकाश आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, याप्रकरणी संभाजी भिडे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी क्लीन चिट दिली आहे. ते म्हणाले, संभाजी भिडे आणि मिलिंद एकबोटे यांना दंगल घडवताना पाहिल्याची तक्रार एका महिलेने केली होती. ती पोलिसांनी नोंदवून घेतली आणि कारवाई सुरू केली. त्यानंतर आजपर्यंत जेवढे पुरावे समोर आलेत, त्यात संभाजी भिडे गुरुजींविरोधात एकही पुरावा नाही. या दंगलीत त्यांचा सहभाग होता, हे स्पष्ट होत नाही, असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले आहे. त्याचवेळी, भिडे गुरुजींची चौकशी बंद केली नसल्याचेही त्यांनी सांगितले. तसेच, प्रकाश आंबेडकरांनी आपल्याकडे एक फेसबुक पोस्ट दिली आहे. भिडे गुरुजींच्या सांगण्यावरूनच दंगल भडकल्याचा दावा त्यांनी या पोस्टच्या आधारे केला आहे. त्या पोस्टचीही चौकशी केली जाईल, असा निर्वाळा मुख्यमंत्र्यांनी दिला.
राज्यातील कायदा-सुव्यवस्थेबाबत विधानसभेत झालेल्या चर्चेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निवेदन केले. त्यावेळी कालचा एल्गार मोर्चा आणि भिडे गुरुजींना अटक करण्याची मागणी, याबाबतही त्यांनी सरकारची बाजू मांडली.
कोरेगाव भीमा दंगलीला चिथावणी देण्याच्या आरोपावरून राज्य सरकारने मिलिंद एकबोटे यांना अटक केली आहे. परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपामुळे राज्य सरकार संभाजी भिडेंना अटक करत नसल्याचा आरोप एल्गार परिषदेचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी केला होता. मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांनी भिडेंच्या अटकेची मागणी केली होती. त्यांना अटक न झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला होता. या संपूर्ण प्रकरणाबाबत बोलताना, भिडे गुरुजींना पाठीशी घालण्याचा प्रश्नच नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.