Join us

‘हिंसा, दहशतवादाला पाठिंबा नाही’

By admin | Published: July 12, 2016 3:47 AM

बांगलादेशातील दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांच्या रडारवर असलेल्या डॉ. झाकीर नाईक यांनी हिंसा, दहशतवादाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे.

मुंबई : बांगलादेशातील दहशतवादी हल्ल्यानंतर पोलिसांच्या रडारवर असलेल्या डॉ. झाकीर नाईक यांनी हिंसा, दहशतवादाला पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्याविरुद्ध ‘मीडिया ट्रायल’ सुरू असल्याचे सौदी अरेबियात असलेल्या नाईक यांनी सोमवारी जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.माध्यम हे नायकाला खलनायक करू शकते. खलनायकाला नायक करण्याची ताकदही माध्यमांमध्ये आहे. अशा माध्यमांमध्ये माझ्या भाषणांचा काही अंश दाखवून त्याचा चुकीचा अर्थ घेतला जात आहे. मात्र मी कधीही हिंसा आणि दहशतवादाला पाठिंबा दिला नसल्याचे डॉ. नाईक यांनी सांगितले. माझ्या भाषणांचा काही भाग अर्धवट घेतला गेला आहे. आजपर्यंत मी कधीही हिंसा किंवा दहशतवादाचे समर्थन केलेले नाही. माझ्या विधानांचा चुकीचा अर्थ घेऊन हिंसा करणाऱ्यांचा मी निषेध करतो, असे नाईक यांनी म्हटले आहे.आजवर एकाही भारतीय अधिकाऱ्याने माझ्याशी संपर्क साधलेला नाही. मात्र मी कोणत्याही चौकशीला तयार असल्याचे नाईक यांनी स्पष्ट केले. मुंबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नाईक यांनी त्यांच्या अनेक भाषणांमध्ये जिहादबाबत उल्लेख केल्याचे समजते. मात्र त्यावर त्यानंतर त्यांनी त्यांच्या भाषणांमध्ये सारवासारवही केली आहे. त्यानुसार अधिक तपास सुरू आहे. नाईक यांचा कुठल्या दहशतवादी संघटनेसोबत काही संबंध आहे का? ते कुणाच्या संपर्कात आहेत याबाबत तपास सुरू झाला आहे. कल्याण (ठाणे) आणि मालवणीतून (मुंबई) इसिसमध्ये गेलेले तरुणदेखील नाईकच्या भाषणांमुळे प्रेरित झाल्याची माहिती समोर येत असल्याने त्या दिशेनेही पोलिसांचा तपास सुरू आहे.