Join us

पदोन्नतीसाठी मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आंदोलनाचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 6:23 AM

पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होऊनही, ५८६ पोलीस तरुणांना पदोन्नतीपासून डावलले.

मुंबई : पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षेत गुणवत्ता यादीत उत्तीर्ण होऊनही, ५८६ पोलीस तरुणांना पदोन्नतीपासून डावलले. पुढील दोन दिवसांत ५८६ त्यांना पदोन्नतीचा आदेश मिळाला नाही, तर मराठा क्रांती मोर्चातर्फे १८ डिसेंबरला आंदोलन केले जाईल, अशी भूमिका मराठा क्रांती ठोक मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी मांडली.पाटील म्हणाले, ५८६ तरुणांना पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय पदोन्नती परीक्षेत २३० पेक्षा जास्त गुण मिळालेले आहेत. पदोन्नती परीक्षा पास होऊन एक वर्षे उलटून गेले, तरीही त्यांना पदोन्नती देण्यात आली नाही. हे पोलीस तरुण १२ ते १४ तास आपली कर्तव्ये पार पाडत असतात. त्यांच्यावर सातत्याने अन्याय होत आहे. या संदर्भात निर्णय घेण्यात आला नाही, तर मराठा क्रांती ठोक मोर्चा आंदोलन करेल. पोलीस तरुणांवर सातत्याने अन्याय होत आहे. तसेच, महसूल विभागातील अप्पर जिल्हाधिकारी पदोन्नतीबाबत अशीच स्थिती आहे. राज्यातील अप्पर जिल्हाधिकारी संवर्गात सद्यस्थितीत ३४ पदे रिक्त आहेत. राज्यामध्ये ७२ उपजिल्हाधिकारी कार्यरत असताना, त्यांना रिक्त पदावर पदोन्नती दिली जात नाही. याबाबत मुख्यमंत्री, महसूलमंत्र्यांना अनेकदा निवेदन देऊनही सकारात्मक भूमिका घेतली नसल्याचे पाटील म्हणाले.

टॅग्स :मराठा