मुंबई : विक्रोळी पूर्वेकडील हरियाली व्हिलेज परिसरात २० ते २५ टक्के कमिशनवर चलनातून रद्द केलेल्या नोटा स्विकारण्याचा व्यवहार सुरु होता. याचे बिंग फोडण्यासाठी तेथे स्टिंग आॅपरेशन करत असलेल्या चार पत्रकारांना येथील माफियांनी मारहाण केल्याची धक्कादायक घटना सोमवारी घडली. मारहाण प्रकरणी तीन माफियांना विक्रोळी पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पाचशे आणि हजारांच्या नोटा चलनातून रद्द केल्यानंतर अनेकजण बँकांकडे धाव घेत आहेत. मात्र बँकामध्ये देखील चार ते पाच तास रांगा लावून पैसे मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची भावना आहे. याच संधीचा फायदा घेत विक्रोळीत काही माफिया जुन्या पाचशे आणि हजारांच्या नोटा नागरिकांकडून घेउन त्या बदल्यात २० ते २५ टक्के कमिशन कापून घेत असल्याचा प्रकार गेल्या तीन दिवसांपासून सुरु होता. ही बाब पत्रकारांना समजताच त्यांनी तेथील स्टिंग आॅपरेशन केले. दरम्यान याठिकाणी ५ ते ८ दुकानदार ५०० रुपायांच्या जुन्या नोटा घेऊन ४०० रुपये तसेच दहा हजार रुपयांचे ८ हजार रुपये देत होते. यावेळी याठिकाणी अनेक रांगेत उभ्या असलेल्या लोकाना दुकानदार पैसे वाटप करत होते. हा सर्व प्रकार पत्रकारांनी कॅमेऱ्यात कैद केल्यानंतर याची माहिती या माफियांना मिळाली.त्यानंतर या माफिंयांनी पत्रकार प्रशांत बढे, अमोल पेडणेकर आणि कॅमेरामन मयूर राणे, संतोश पांडे यांना मारहाण केली. त्यांच्या कॅमेऱ्याची देखील तोडफोड करण्यात आली. याबाबत पत्रकारांनी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी याप्रकरणी राजेश यादव (३७), भुल्लन यादव (४०) आणि एका अल्पवयीन मुलाला अटक केली असून अन्य काही आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. (प्रतिनिधी)
विक्रोळीत काळ्या पैशांचा व्यवहार तेजीत
By admin | Published: November 15, 2016 6:27 AM