सायलेंट किलरची व्हॉयलेन्ट स्टोरी! मृतदेह सूटकेसमध्ये ठवून CSMT ते दादर प्रवास; 2 मूकबधिरांनी केली तिसऱ्याची हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 02:29 PM2024-08-07T14:29:33+5:302024-08-07T14:31:39+5:30

या प्रवासादरम्यान त्याच्या बॅगेत सामान नसून मृतदेह आहे, याचा त्याने कुणालाही थांगपत्ता लागू दिला नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

Violent Story of Silent Killer! Traveling to Dadar from CSMT with dead bodies in suitcases; 2 deaf mutes kill third | सायलेंट किलरची व्हॉयलेन्ट स्टोरी! मृतदेह सूटकेसमध्ये ठवून CSMT ते दादर प्रवास; 2 मूकबधिरांनी केली तिसऱ्याची हत्या

सायलेंट किलरची व्हॉयलेन्ट स्टोरी! मृतदेह सूटकेसमध्ये ठवून CSMT ते दादर प्रवास; 2 मूकबधिरांनी केली तिसऱ्याची हत्या

मुंबई : दादरमधील अर्शद अली सादीक अली शेख (३०) या मूकबधिराच्या निर्घृण हत्येनंतर आरोपीने मृतदेह सुटकेसमध्ये भरला. सुटकेस घेऊन त्याने पायधुनी येथून टॅक्सीने सीएसएमटी स्थानक गाठले. तेथून खोपोली लोकल पकडून तो दादरला उतरला. या प्रवासादरम्यान त्याच्या बॅगेत सामान नसून मृतदेह आहे, याचा त्याने कुणालाही थांगपत्ता लागू दिला नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.

दादर स्थानकात रात्री बाराच्या सुमारास तुतारी एक्स्प्रेसमध्ये सुटकेस चढवताना आराेपी जय चावडा याची दमछाक झाली. गस्तीवरील पोलिसाने संशयास्पद हालचाली हेरल्याने स्टोरीचा उलगडा झाला. कलिना सांताक्रुझ परिसरात राहणाऱ्या मूकबधिर अर्शद विवाहित असून त्याला दोन मुले आहेत. त्याची पत्नीही मूकबधिर आहे. तो छोटी- मोठी कामे करून कुटुंबीयांचा उदरनिर्वाह करत होता. पायधुनी येथील गुलाल वाडी परिसरात राहणाऱ्या श्रीमंत कुटुंबातील जय प्रवीण चावडा (३२)  आणि  शिवजीत सुरेंद्र सिंग (३३) यांच्यासोबत त्याची क्रिकेट खेळातून मैत्री झाली होती. जय हा अंधेरीतील एका लॅबमध्ये ॲनिमेशनचे काम करतो. त्याची आई, भाऊ कॅनडामध्ये असतात. तो कलावंतही आहे. शिवजीत हा बेरोजगार आहे. प्रत्येक रविवारी तिघेही जयच्या घरी दारू पार्टी करत. रविवारी नेहमीप्रमाणे तिघेही जयच्या घरी जमले.

जयकडे केलेल्या चौकशीत, त्याची अर्शदसोबत दोन वर्षांपासून ओळख होती. त्याच्यामुळेच जयची शिवजीतशीही ओळख झाली. रविवारी संध्याकाळी ७ वाजता शिवजीत घरी आला. त्याच्यापाठोपाठ अर्शदही घरी आला. आठच्या सुमारास दोघे दारू पिऊन आले. तेव्हा अर्शद आणि शिवजीतमध्ये बाचाबाची सुरू होती. अर्शदच्या बायकोवरून शिवजीतसोबत त्याचे भांडण सुरू होते. याच बाचाबाचीचे रूपांतर हाणामारीत झाले. यावेळी शिवजीतने अर्शदचे कपडे काढून त्याचे हात बांधले आणि त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. दारूच्या बाटल्या फोडून त्यानेच त्याला ओरखडण्यास सुरुवात केली. जय त्यांच्या भांडणाचा व्हिडीओ मोबाइलमध्ये काढत होता. त्याचदरम्यान शिवजीतने रूममध्ये पडलेल्या हातोडीने अर्शदच्या डोक्यात प्रहार केला. 

या हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह सुटकेसमध्ये भरला. शिवजीत दारूच्या नशेत असल्याने त्याने धमकावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्याची जबाबदारी जयवर  सोपविल्याचे प्राथमिक चौकशीत समोर आले. 

साडेआठच्या सुमारास अर्शदची हत्या झाल्यानंतर तासाभरानेच शिवजीतच्या मदतीने जयने सुटकेस खाली आणली. इमारतीच्या खाली टॅक्सी पकडली. शिवजीत सुटकेस टॅक्सीच्या मागच्या सीटवर ठेवून तो निघून गेला.

दादरच्या फलाट क्रमांक ११ वर जय याने सुटकेस घेऊन तुतारी एक्स्प्रेसमध्ये चढण्याचा प्रयत्न केला. यावेळी रेल्वे पोलिस अंमलदार माधव केंद्रे यांची नजर त्याच्यावर पडली. त्याच्या संशयित हालचालींवरून त्याच्या बॅगेची झडती घेताच त्यात अर्शदचा मृतदेह आढळला आणि सगळा प्रकार उघडकीस आला.

प्रेमप्रकरण की पैसे?
आरोपींनी एका मुलीच्या प्रकरणातून हत्या केल्याचे सांगितले. त्यानंतर दुसऱ्या वेळी दोन लाख रुपये देणे असल्याच्या वादातून काटा काढल्याचे सांगितले. त्यामुळे हत्येमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

व्हिडीओ कॉल करत हत्या
शिवजीतची एका तरुणीसह दोघांना व्हिडीओ कॉल करून अर्शदला नग्न करत क्रूरपणे मारहाण सुरू होती. तो जीव वाचवण्यासाठी गयावया करत होता. व्हिडीओ कॉलमधील व्यक्ती तिसऱ्या मूकबधिर व्यक्तीला व्हिडीओ कॉल करून मारहाणीचे लाइव्ह चित्रण दाखवत होते. ती तरुणीदेखील आणखी मारण्यासाठी प्रोत्साहित करत होती. यातील व्हिडीओ काॅलमधील व्यक्ती मास्टरमाइंड असून ती दुबईत असल्याचा आरोप नातेवाइकांकडून करण्यात येत आहे. हे व्हिडीओ रेकॉर्डिंग पोलिसांकडे आहे. यामागे मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे. त्या तीन व्यक्ती कोण, त्यांचे कनेक्शन काय? याची चौकशी सुरू आहे.

Web Title: Violent Story of Silent Killer! Traveling to Dadar from CSMT with dead bodies in suitcases; 2 deaf mutes kill third

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.