लोकमत न्यूज नेटवर्क , मुंबई : जागतिक ख्यातीचे सारंगीवादक पद्मविभूषण पंडित राम नारायण (९७) यांचे शुक्रवारी वृद्धापकाळाने निधन झाले. वांद्रे येथील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात मुलगा सरोदवादक ब्रिज नारायण आणि नातू सारंगीवादक हर्ष नारायण असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर शनिवारी संध्याकाळी शिवाजी पार्क स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. पं. राम नारायण यांचा काही महिन्यांपूर्वीच ‘लोकमत’चा सूर ज्योत्स्ना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला होता.
उदयपूर येथे २५ डिसेंबर १९२७ रोजी जन्मलेल्या राम नारायण यांनी सारंगीला संगीत वाद्य म्हणून एक वेगळी ओळख निर्माण करून दिली. त्यांच्या वडिलांनी जयपूरमधील सारंगीवादक मेहबूब खान यांना राम नारायण यांना सारंगी शिकवण्याची विनंती केली.१९४४मध्ये त्यांनी लाहोरमधील ऑल इंडिया रेडिओसाठी काम केले. १९४७ मधील भारत-पाकिस्तान फाळणीनंतर ते दिल्लीमध्ये स्थलांतरित झाले. भारतीय सिनेसृष्टीत काम करण्याच्या उद्देशाने १९४९मध्ये ते मुंबईमध्ये आले.
राम नारायण यांना १९७४-७५ मध्ये राजस्थान संगीत नाटक अकादमी पुरस्कार आणि १९७५ मध्ये राष्ट्रीय संगीत नाटक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आले. १९८८-८९ मध्ये त्यांना राजस्थान संगीत नाटक अकादमीचे फेलो बनवण्यात आले. १९७६मध्ये पद्मश्री, १९९१ मध्ये पद्मभूषण आणि २००५मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. मध्य प्रदेश सरकारकडून त्यांना कालिदास सन्मान, तसेच १९९९ मध्ये महाराष्ट्राचे राज्यपाल पी. सी. ॲलेक्झांडर यांच्या हस्ते आदित्य विक्रम बिर्ला कलाशिखर पुरस्कार प्रदान करण्यात आला. २०१३ मध्ये राजस्थान रत्न आणि चौथा ग्लोबल इंडियन म्युझिक अकादमी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
संगीत क्षेत्रातील महान व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली आहे. कोणत्याही प्रकारचा प्रसिद्धीचा हव्यास नसलेले आणि केवळ संगीताचा ध्यास असलेली व्यक्ती. जगभरात जिथे भारतीय अभिजात संगीत पोहोचले, तिथे राम नारायणही पोहोचले. ६०-७०च्या दशकात त्यांच्या सांगीतिक मैफली खूप गाजल्या. भारतातील संगीत क्षेत्रातील सर्वच पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. पारंपरिक संगीताचा वारसा अतिशय श्रद्धेने, प्रामाणिकपणे आणि निष्ठेने जपण्याचे काम त्यांनी केले आहे. त्यांनी भारतीय संगीत केवळ आत्मसात केले नसून, ते जपले आणि त्याचा विकासही केला.- शशी व्यास, संस्थापक, माहिती ग्रेस फाउंडेशन
माझे परम आदरणीय गुरुजी पद्मविभूषण पंडित राम नारायण गेल्याचे ऐकून धक्का बसला आहे. माझे दु:ख व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. गुरुजींचा वारसा सर्व संगीतप्रेमी जपतील. त्याचे परंपरा आणि मार्गदर्शन आपण सर्वांनी सामायिक केलेल्या आठवणींमध्ये जिवंत राहील. त्यांचा मुलगा पंडित ब्रिजभाई, मुलगी अरुणा दीदी कल्ले, नातू हर्ष नारायण आणि आम्ही शिष्य त्यांचा वारसा पुढे चालवू. गुरुजींच्या प्रेमळ आठवणी कायम स्मरणात राहतील. ओम शांती.- पद्मजा फेणाणी-जोगळेकर, गायिका, संगीतकार