Join us  

व्हीआयपी नंबरमुळे कोट्यवधींची कमाई

By admin | Published: October 19, 2015 1:38 AM

वाहनांची नोंदणी करतानाच त्यांना लागणाऱ्या आकर्षक आणि व्हीआयपी नंबरची मागणी वाहन मालक आणि चालकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे.

मुंबई : वाहनांची नोंदणी करतानाच त्यांना लागणाऱ्या आकर्षक आणि व्हीआयपी नंबरची मागणी वाहन मालक आणि चालकांकडून मोठ्या प्रमाणात होत आहे. व्हीआयपी नंबरमुळे सहा महिन्यांत ताडदेव आरटीओला १ कोटी ७१ लाखांचा महसूल मिळाला आहे. वाहन मालक-चालकांकडून नऊ नंबर क्रमांकाला सर्वांत जास्त मागणी असल्याचे सांगण्यात आले. ताडदेव आरटीओंतर्गत संपूर्ण दक्षिण मुंबईचा भाग येतो. या भागात सर्वसामान्यांबरोबरच धनाढ्य लोकांची संख्याही अधिक आहे. त्यामुळे वाहनांची नोंदणी करतानाच व्हीआयपी नंबर मिळविण्यासाठीही अनेकांची धडपड होताना दिसते. ताडदेव आरटीओत रिलायन्स इंडस्ट्रीजच्या दोन महागड्या कारची नोंद करतानाच व्हीआयपी नंबर मिळवण्यासाठी जादा पैसे मोजले. रिलायन्स इंडस्ट्रीजचे मुकेश अंबानी यांनी ८ कोटी ४१ लाख रुपये खर्चून बीएमडब्ल्यू ७६0-एलआय या प्रकारातील बुलेटप्रूफ कार विकत घेतली आहे. या कारसाठी व्हीआयपी असलेल्या बीएस सिरिजमधील नंबर मिळविला. त्यासाठी तब्बल २ लाख १0 हजार रुपये मोजले. ही कार विकत घेतलेली असतानाच आणखी एक बीएमडब्ल्यू प्रकारातील कार विकत घेतली. तब्बल ९ कोटी ६१ लाख रुपये किंमत असलेल्या दुसऱ्या कारच्या नंबरप्लेटसाठीही ७0 हजार रुपये मोजण्यात आले. वाहनांची नोंद होतानाच चालक किंवा मालकाकडून व्हीआयपी नंबरांनाही मोठ्या प्रमाणात ताडदेव आरटीओत मागणी आहे. एप्रिल ते सप्टेंबरपर्यंत तब्बल १ हजार ८९१ व्हीआयपी नंबरच्या केसेसची नोंद झाली असून, यातून १ कोटी ७१ लाख १0 हजार रुपये महसूल ताडदेव आरटीओला मिळाला आहे. याबाबत ताडदेवचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुभाष पेडामकर यांनी सांगितले की, व्हीआयपी नंबरमुळे ताडदेव आरटीओला चांगला महसूल मिळाला आहे. व्हीआयपी नंबरच्या तब्बल १ हजार ८९१ केसेसची नोंद झाली आहे. सर्वांत जास्त मागणी ही नऊ नंबरमधील सिरिजला आहे. (प्रतिनिधी)