विपुल अंबानीचा जामीन मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2018 05:53 AM2018-08-05T05:53:23+5:302018-08-05T05:53:38+5:30
पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या फायर स्टार डायमंडचा वरिष्ठ कार्यकारी अधिकारी विपुल अंबानी याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने शनिवारी मंजूर केला.
मुंबई : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील मुख्य आरोपी नीरव मोदी याच्या फायर स्टार डायमंडचा वरिष्ठ कार्यकारी अधिकारी विपुल अंबानी याचा जामीन अर्ज विशेष न्यायालयाने शनिवारी मंजूर केला.
कोट्यवधींच्या घोटाळ्याप्रकरणी सीबीआयने विपुल अंबानी याला फेबु्रवारीत अटक केली. सीबीआयच्या म्हणण्यानुसार, पीएनबीच्या माजी उपव्यवस्थापक गोकूळनाथ शेट्टी यांनी नीरव मोदीच्या फर्मसाठी बनावट हमीपत्र दिल्याची माहिती अंबानीला होती. शनिवारी विशेष सीबीआय न्यायालयाने अंबानीचा जामीन अर्ज मंजूर करीत त्याला एक लाखांचा वैयक्तिक जात मुचलका भरण्याचा आदेश दिला. अंबानीवर दोषारोपपत्र दाखल केल्याने पोलिसांना त्याच्या कोठडीची आवश्यकता नाही, असे म्हणत न्यायालयाने त्याचा जामीन मंजूर केला. मात्र, परवानगीशिवाय देश सोडून जाण्यास मनाई केली.
३१ जानेवारी रोजी सीबीआयने मोदी, त्याचा काका मेहुल चोकसी, पीएनबीच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा नोंदविला. २८० कोटी रुपयांच्या आठ बनावट ट्रान्झॅक्शन केल्याचा आरोप सीबीआयने ठेवला आहे. पीएनबीने केलेल्या तक्रारीनंतर ही रक्कम ६,४९८ कोटी रुपयांपर्यंत गेली.