मुंबई: ब्लड कॅन्सरचा आजार असलेल्या रुग्णांसाठी ब्लड स्टेम सेल ट्रान्सप्लांट हा एकमेव पर्याय असतो. यामुळे या रुग्णांना नवजीवन मिळू शकते, असे सांगितले जाते. मुंबईतील २९ वर्षीय विपुल नामक तरुणाला ब्लड कॅन्सरमधील मायलोफायब्रोसिस नावाचा दुर्मिळ आजार झाल्याचे निदान झाला आहे. विपुलला आताच्या घडीला ब्लड स्टेम सेल डोनरची आत्यंतिक गरज असल्याची माहिती मिळाली आहे.
विपुलला झालेला ब्लड कॅन्सर दुर्मिळ असून, यामुळे शरीरात रक्त तयार करण्याची प्रक्रिया प्रभावित होते. त्यामुळे ब्लड स्टेम सेल ट्रान्सप्लांट करणे आवश्यक आहे. विपुलला स्टेम सेल डोनर मिळण्यासाठी व्हर्चुअल पद्धतीने एक अभियान चालवले जात आहे. अशा प्रकारच्या आजारांमध्ये रुग्णांना मदत मिळण्यासाठी डीकेएमएस बीएमएसटी फाऊंडेशन ऑफ इंडिया नावाची संघटना काम करते. या संस्थेकडून हे अभियान चालवले जात आहे. यामध्ये आपण नोंदणी करून एखाद्याच्या जीवाचे रक्षण करू शकतो.
वेल्लोर येथील एका मेडिकल कॉलेजमध्ये विपुलवर उपचार सुरू आहेत. विपुलवर उपचार करणारे डॉ. बीजू जॉर्ज यांनी सांगितले की, विपुलची प्रकृती गंभीर असून, त्याचा वाचवण्यासाठी मॅचिंग डोनर मिळणे अतिशय गरजेचे आहे. विपुलची एका बहिणीचे ५/१० एचएलए मॅच होत आहे. मात्र, विपुलच्या कुटुंबातील अन्य कोणत्याही व्यक्तीचा परफेक्ट मॅच होत नाही. त्यामुळे विपुलसाठी आता अन्य डोनरच्या शोधात आहे. ग्लोबल डेटाबेसमध्येही याबाबत शोध घेण्यात आला. मात्र, परफेक्ट मॅच मिळाला नाही. त्यामुळे डोनर शोधणे कठीण जात आहे. म्हणूनच भारतीय ब्लड स्टेम सेल डोनर यांनी अधिकाधिक प्रमाणात नोंदणी करावी आणि विपुलसारख्या तरुणाचे प्राण वाचवावे, असे ते म्हणाले.
या संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पॅट्रिक पॉल यांनी म्हटले की, आकड्यांवर नजर टाकल्यास रक्ताशी संबंधित आजार असलेल्यांची संख्या ३० टक्के रुग्णांना स्टेम सेल ट्रान्सप्लांटची आवश्यकता असते, जी नातेवाइकांच्या माध्यमातून पूर्ण होते. मात्र, ७० टक्के रुग्णांना डोनर शोधावे लागतात, असे त्यांनी नमूद केले. तसेच www.dkms-bmst.org/Vipul या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे.
विपुल हा अतिशय हुशार असून, कम्प्युटर अॅप्लिकेशनमध्ये करिअर करण्याची त्याची इच्छा आहे. तसेच साहसी खेळांमध्ये त्याला मोठी रुची असून, जीवनाचा आनंद घेत त्याने आतापर्यंतचे आयुष्य व्यतीत केले आहे. मार्च २०२१ मध्ये विपुलला मायलोफायब्रोसिस या दुर्मिळ ब्लड कॅन्सच्या आजार असल्याचे निदान झाले. त्यानंतर त्याचे आयुष्य थांबल्यासारखे झाले आहे. त्यामुळे विपुलचा जीव वाचावा म्हणून स्वेच्छेने पुढे येण्याचे आवाहन केले जात आहे.