विराफीन हे कँसरविरोधी औषध, पण त्याचा वापर जपून करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 12:48 AM2021-04-25T00:48:16+5:302021-04-25T00:48:27+5:30

संशोधकांचे वैद्यकीय यंत्रणेला आवाहन

Virafine is an anti-cancer drug, but use it with caution! | विराफीन हे कँसरविरोधी औषध, पण त्याचा वापर जपून करा!

विराफीन हे कँसरविरोधी औषध, पण त्याचा वापर जपून करा!

googlenewsNext

सीमा महांगडे

मुंबई : कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत असून, सध्या परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. कोरोनाच्या या लढ्यामध्ये सध्या आपल्याकडे फक्त लसीचा आणि रेमडेसिविरचा वापर प्रमाणावर होत आहे; पण सध्या तुटवड्याची स्थिती निर्माण झाली असल्याने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात डीजीसीआयने आपत्कालीन वापरासाठी झायडस कॅडिला कंपनीच्या विराफीन या औषधाला कोरोनाच्या उपचारांसाठी आपत्कालीन वापरासाठी मान्यता दिली आहे.

एक कँसरविरोधी ड्रग असल्याने त्याचे जेवढे फायदे तेवढेच तोटे आहेत. त्यामुळे याची किंचित जरी अधिक मात्रा दिली तर रुग्णांना दुष्परिणाम दिसू शकतात, अशी महिती ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या मेडिकल सायन्स डिव्हिजनचे मेरी क्युरी वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. नानासाहेब थोरात यांनी दिली.

दोनच दिवसांपूर्वी भारत सरकारच्या औषध नियामक संस्थेने झायडस कॅडीला कंपनीचे विराफीन हे औषध कोविड-१९ रुग्णांसाठी उपयोगी आहे म्हणून त्याला आपत्कालीन मान्यता दिली. याच्या आरोग्य चाचण्या फक्त ४० रुग्णांवर झाल्या आहेत. विराफीन हे नवीन औषध नसून ते मूळचे इंटरफेरॉन अल्फा-२ ब या रासायनिक संयुगांचा पुढचा प्रकार आहे. हे संयुग १९८० मध्ये स्वीत्झर्लंडमधील ज्युरिक विद्यापीठात चार्ल्स वेस्मान या शास्त्रज्ञाने शोधले असल्याची माहिती नानासाहेब यांनी दिली. इंटरफेरॉन अल्फा-२ ब याआधी अमेरिका-युरोप आणि आशियन देशात कॅन्सर ड्रग म्हणून वापरले जात असून, रेमडेसिविरसारखेच हे औषधसुद्धा क्रोनिक हेपेटायटिस बी, क्रोनिक हेपेटायटिस सी (रक्ताची कावीळ) यासाठी वापरले जात असल्याचे त्यांनी सांगितले.

इंटरफेरॉन हे संयुग, आपल्या शरीरातील पेशींकडून, व्हायरसच्या आक्रमणाविरोधात वेगाने बनविले जाते. व्हायरस कोणता आहे याचा त्याच्याशी काही संबंध नसतो, तसेच हे संयुग कॅन्सर पेशींविरुद्ध हल्ला करण्यास आपल्या प्रतिकारशक्तीला मदत करते. 
कोविड-१९ रुग्णांवर फक्त याच औषधाचे इंजेक्शन पुरेसे नसून इतर उपचार सुरू ठेवावे लागतात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हे औषध देण्यासाठी डॉक्टर्स आणि नर्सना पूर्वप्रशिक्षण द्यावे लागत असल्याची माहिती थोरात यांनी दिली.

Web Title: Virafine is an anti-cancer drug, but use it with caution!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.