मुंबई : मुंबईसह राज्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा शिरकाव झाला असून, डॉक्टरांनी नागरिकांना श्वसनसंस्था जपण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर सर्दी, ताप, खोकला, कोरोना आणि ओमायक्रॉन आजारांची लक्षणे सारखी असल्याने मुंबईकर संभ्रमात आहेत. त्यामुळे दवाखाने- रुग्णालयात रुग्णांचा ओढा वाढला आहे.
पहिल्या व दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेमध्ये सर्वांनी श्वसनसंस्था म्हणजेच नाक, कान व घसा जपण्याचे प्रयत्न केले पाहिजेत, कारण या लाटेमध्ये घसा दुखणे, खवखवणे, नाक वाहणे, नाकाला सूज येणे अशी लक्षणे दिसत आहेत. ही लक्षणे सर्दी किंवा थंडीमुळेही दिसू शकतात, असे नाक, कान, घसा तज्ज्ञ व शल्यचिकित्सक डॉ. भाविक शाह यांनी सांगितले.
इंटरनेटवरील उपायांपासून दूर राहा
श्वसनसंस्था या खूपच नाजूक असतात त्यामुळे इंटरनेटवरील उपायांपासून दूर राहणे अधिक हितकारक आहे. कारण अनेक नागरिक घसा बरा करण्यासाठी विविध प्रकारचे चाटण अथवा काढे घेतात व त्याच्या दुष्परिणामामुळे अथवा ॲलर्जीमुळे घशाला इन्फेक्शन होऊ शकते. अनेक नागरिक घशामध्ये बोटे घालून उलटी करण्याचा प्रयत्न करतात. ते सुद्धा या काळात थांबवले पाहिजे. श्वसनयंत्रणेला काही आजार अथवा इन्फेक्शन झाले तर डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.
प्रदूषणामुळेही श्वसनविकार
सध्या वातावरणात धुरक्याचे (विषारी धूर व धूळ यांचे मिश्रण) प्रमाण वाढीस लागले असून याचा थेट परिणाम तुमच्या घशावर होतो. अनेक नागरिक मॉर्निंग वॉक करून घरी आल्यावर घसा बसल्याची तक्रार करतात. सध्या वातावरणात धुळीचे प्रमाण जास्त आहे, त्यामुळे बाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क घालणे गरजेचे आहे. ज्येष्ठ नागरिक व लहान मुलांमध्ये श्वसनविकार वाढल्याचे समोर आले आहे.
सोशल मीडियावर मिम्स
कोरोना संसर्ग, आजार आणि लॉकडाऊनविषयी साशंक असणाऱ्या नेटिझन्समध्ये सोशल मीडियावर संदेश आणि विनोदी किस्सांचा धुमाकूळ सुरू आहे. त्यात ‘अर्धी मुंबई सर्दीत आहे आणि अर्धी मुंबई खोकल्यात.. डॉक्टरकडे गेलात तर बरे व्हाल, टेस्ट केली तर जमा व्हाल’ असे मेसेज अनेकांनी स्टेटस म्हणून ठेवले आहेत.