Join us  

तरुणीचा फोटो मार्फ करुन व्हायरल, ५ मोबाईल क्रमांकांविरुद्ध गुन्हा

By प्रदीप भाकरे | Published: October 07, 2022 11:59 AM

कर्ज न घेता परतफेडीसाठी ऑनलाईन छळवणूक : तिच्या चेहऱ्याला जोडले अन्य महिलेचे न्युड शरिर

प्रदीप भाकरे

अमरावती : न घेतलेल्या कर्जाची तिप्पट रक्कम परत करण्यास नकार दिल्याने एका २७ वर्षीय तरूणीच्या छायाचित्राचे मॉर्फिंग करण्यात आले. ही धक्कादायक घटना धामणगाव रेल्वे येथील एका निवासी लेआऊटमध्ये घडली. याप्रकरणी त्या तरूणीच्या तरूणीच्या तक्रारीवरून दत्तापूर पोलिसांनी पाच मोबाईल क्रमांकधारकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

धामणगाव रेल्वे येथील एका २७ वर्षीय तरूणी ही मोबाईल हाताळत असताना कॅश प्लेनेट या ॲपवरून तिच्या खात्यात ४०७० रुपये जमा झाले. २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३.३५ च्या सुमारास हा प्रकार घडला. दरम्यान, त्यानंतर वेगवेगळ्या मोबाईल क्रमांकावरून तिला फोन कॉल करण्यात आले. आम्ही तुम्हाला ४०७० रुपये पाठविले होते, त्याची तुम्हाला १२ हजार रुपये परतफेड करावी लागेल, असा हेका धरण्यात आला. मात्र, कर्जच न घेतल्याने परतफेड कशाची, असा विचार करून तिने ती रक्कम परत केली नाही. त्यामुळे आरोपी मोबाईल क्रमांक धारकांनी तिच्या व्हॉट्सॲप डीपीवरील छायाचित्र कॉपी केले. तिचा चेहरा अन्य एका महिलेच्या नग्न शरीराला जोडला. आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर त्यांनी तिचा मोबाईलमधील कॉन्टॅक्ट लिस्ट हॅक करत ते मॉर्फ केलेले छायाचित्र तिच्या संपर्कातील व्यक्तींना व्हॉट्सॲपवर पाठवून ऑनलाईन व्हायरल करून तिची बदनामी केली. काही संपर्कातील व्यक्तींनी सांगितल्यानंतर हा प्रकार उघड झाला. त्यामुळे त्या तरूणीने दत्तापूर पोलीस ठाणे गाठले. तर एनसीसीआरपी पोर्टलवर देखील तक्रार नोंदविली.

अशी आहे शिक्षा

एखाद्या व्यक्तीचा चेहऱ्याचा भाग किंवा शरीराचा कोणताही भाग मॉर्फ अथवा एडिट करुन विविध माध्यमांद्वारे तो इंटरनेटवर अपलोड करणे हा कायद्यान्वये गुन्हा आहे. अशा व्यक्तींवर माहिती आणि तंत्रज्ञान (आयटी) कायद्यानुसार गुन्हा दाखल होऊ शकतो. अशा या प्रकरणात आयटी ॲक्टबरोबरच विनयभंगाचाही गुन्हा दाखल होऊ शकतो. तसेच आयटी ॲक्टमध्ये तरुणींसंबंधात ६६ (अ), ६६ (ब), ६६ (सी), ६६ (डी) आणि ६६ (ई) कारवाई केली जाते. सायबर कायद्यानुसार अशा व्यक्तीस तीन वर्षाची शिक्षा आणि लाखांपर्यंत दंड होऊ शकतो.

अशी होते आहे फसवणूक

ऑनलाईन झटपट कर्ज प्रकरणाच्या मोहात नागरिकांची फसवणूक होत आहे. पाच ते पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज तात्काळ भेटते; पण कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी संबंधित व्यक्तीचा छळ होत आहे. तात्काळ अवघ्या काही मिनिटांमध्ये कर्ज मिळत असल्याने अनेकजण हे कर्ज घेतात. या कंपन्यांकडून कर्ज वसुलीसाठी नातेवाईकांना फोन करणे, फोटो मॉर्फिंग करून ते व्हायरल करणे, असे गैरप्रकार करून अव्वाच्या सव्वा रक्कमेची वसुली केली जाते. त्यामुळे नागरिकांना बदनामीला सामोरे जावे लागते अन्यथा रक्कम भरावी लागत आहे. 

टॅग्स :गुन्हेगारीसोशल व्हायरलअमरावतीपोलिससायबर क्राइम