सोशल मीडियावरील मेडिकल दुकानांची ‘व्हायरल’ यादी चुकीची, जाणून घ्या सत्य
By ऑनलाइन लोकमत | Published: July 14, 2020 09:50 PM2020-07-14T21:50:30+5:302020-07-14T21:51:17+5:30
एफडीएने यादी जाहीर केली नाही, अन्न व औषध प्रशासनाचे स्पष्टीकरण
मुंबई - मुंबईत कोरोनावरील औषधांचा काळाबाजार होत असल्याच्या तक्रारी आल्यानंतर हा काळाबाजार रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने कठोर पावलं उचलली आहेत. या विभागाने कोरोनाची औषधे मिळणाऱ्या अधिकृत मेडिकलची नावे जाहीर केल्याचे सांगत सोशल मीडीयावर दुकानांची नावे असलेली यादी व्हायरल होत आहे. मात्र ही यादी चुकीची असून याविषयी अन्न व औषध प्रशासनाने धक्कादायक खुलासा केला आहे. मेडिकल्सची अशी कोणतीही यादी अन्न व औषध प्रशासनाने जाहीर केली नसल्याचे स्पष्ट केले आहे.
मुंबईत करोनावरील रेमडेसिवीर आणि टॉसिलीझूमॅब या दोन औषधांचा काळाबाजार होत असल्याचे वृत्त आले होते. करोनाचा काळाबाजार होत असल्याने नागरिकांनी घाटकोपरसह इतर ठिकाणच्या मेडिकल समोर या दोन औषधांसाठी मोठ्या रांगा लावल्या होत्या. त्याची दक्षता घेऊन कॅबिनेट मंत्री राजेंद्र शिंगणे यांनी छापेही मारले होते. त्यानंतर अन्न व औषध प्रशासनानेही धडक कारवाईस सुरुवात केली आहे. करोनावरील औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवर औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४०च्या अंतर्गत कारवाई करण्याचा इशारा औषध प्रशासन विभागाने दिला होता.
अन्न व औषध प्रशासनाने याविषयी खुलासा करताना सांगितले , बऱ्याच संकेतस्थळांवर तसेच समाज माध्यमांवर ठराविक मेडिकल्सची यादी आणि संपर्क क्रमांक व्हायरल झाले आहेत. मात्र ही यादी चुकीची असून अशी कोणत्याही स्वरुपाची यादी एफडीएने जाहीर केलेली नाही. परंतु, औषधांचा काळाबाजर कऱणारे एफडीएच्या रडारवर आहेत