Viral song : खास रे... हा 'ऊसाचा रस' एकदा ऐकाच, सुप्रिया सुळेंनाही आवडला रॅप साँगमधला गोडवा
By महेश गलांडे | Published: April 28, 2021 11:22 AM2021-04-28T11:22:36+5:302021-04-28T11:29:51+5:30
राज्य सरकारने कडक निर्बंध लाद्ल्यानंतर सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि विक्रेत्यांना बाहेर फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, एप्रिल महिन्याच्या कडक उन्हाळ्यातही ऊनाची तीव्रता आपल्याला अनुभवता येईना
महेश गलांडे
मुंबई - देशात सध्या कोरोना महामारीचं संकट असून विदारक परिस्थित पाहायला मिळत आहे. वर्तमानपत्र असो, न्यूज चॅनेल असो किंवा सोशल मीडिया असो, सर्वत्र केवळ कोरोना महामारीच्या बातम्यांनी माध्यमं भरली आहेत. ऑक्सिजनचा तुटवडा, रेमेडीसीवीरसाठी नातेवाईकांची वणवण आणि ऑक्सिजनसाठी देशाची सुरु असेलली धडपड पाहून मन खिन्न होत आहे. मात्र, सोशल मीडियात सध्या व्हायरल होणाऱ्या एका मराठी रॅप साँगने सर्वांचेच लक्ष वेधले आहे. कोरोनाच्या नकारात्मक बातम्यांमध्ये 'ऊसाच्या रसाचा' गोडवा सर्वांनाचा भूतकाळात घेऊन गेलाय.
राज्य सरकारने कडक निर्बंध लाद्ल्यानंतर सर्वत्र शुकशुकाट पसरला आहे. केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि विक्रेत्यांना बाहेर फिरण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे, एप्रिल महिन्याच्या कडक उन्हाळ्यातही ऊनाची तीव्रता आपल्याला अनुभवता येईना. कारण, ना गारेगार खाताना कुणी दिसतोय, ना बर्फगोळा घेताना कुणी दिसतोय. रस्त्यावर खाद्यपदार्थ विक्रींना बंदी असल्यानं हे सर्व अदृश्य झालंय. पण, खास रे या युट्यूब चॅनेलच्या कलाकारांनी बनवलेल्या रॅप साँगने नेटीझन्सना ऊसाच्या रसाची आठवण करुन दिलीय. सध्या ऊसाचा रस म्हणून बनवलेला हा रॅप चांगलाच व्हायरल झाला आहे. खासदार सुप्रिया सुळेंनीही या हे गाणं आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन शेअर केलंय.
कडाक्याच्या उन्हात ऊसाचा रस तहान भागवितो. उन्हाळ्यात रस पिण्याची ही मौज न्यारीच आहे.याच सगळ्या भावना गीताच्या माध्यमातून खास रे वरील या गाण्यातून मांडण्यात आल्या आहेत. चांगल्या गाण्याची तहान भागविणारा हा 'ऊसाचा रस' एकदा नक्की ऐकाच. pic.twitter.com/qm6cU54l40
— Supriya Sule (@supriya_sule) April 27, 2021
कडाक्याच्या उन्हात ऊसाचा रस तहान भागवितो. उन्हाळ्यात रस पिण्याची ही मौज न्यारीच आहे. याच सगळ्या भावना गीताच्या माध्यमातून 'खास रे' वरील या गाण्यातून मांडण्यात आल्या आहेत. चांगल्या गाण्याची तहान भागविणारा हा 'ऊसाचा रस' एकदा नक्की ऐकाच, असे म्हणत सुप्रिया सुळे यांनी खास रे च्या टीमंचं कौतुक केलंय.
खास रे काय आहे
'खास रे' हे सोशल मीडियावरील लोकप्रिय डिजिटल माध्यम आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शीच्या संजय श्रीधर यांनी हे चॅनेल सुरू केले असून यापूर्वी त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्यावरील 'डोनाल्ड तात्या'चे मिम्स आणि व्हिडिओ बनवले होते. आपल्या कलाकृतीतून ते नाविन्य जपत नेहमीच वेगवेगळे प्रयोग करत असतात. आता, संजय आणि त्यांच्या टीमने बनविलेला हा ऊसाच्या रसाचा रॅप सध्या सोशल मीडिया गोडवा निर्माण करत आहे. कोरोनाच्या बातम्यांनी आणि व्हिडिओने सोशल मीडिया भरुन गेला असता, हा ऊसाच्या रसाचा भरलेला ग्लास अनेकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवताना भूतकाळात घेऊन जात आहे.