मतपत्रिकेचा फोटो व्हायरल करणे पोलिसाला पडले महागात; निलंबनाची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 01:29 PM2024-11-16T13:29:42+5:302024-11-16T13:29:54+5:30

मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या.

Viralization of Ballot Paper Costs Police Action of suspension | मतपत्रिकेचा फोटो व्हायरल करणे पोलिसाला पडले महागात; निलंबनाची कारवाई

मतपत्रिकेचा फोटो व्हायरल करणे पोलिसाला पडले महागात; निलंबनाची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : बीडमधील आष्टी विधानसभेतील मतदारांची मतपत्रिका व्हायरल झाल्याने खळबळ उडाली. अधिकाऱ्यांच्या चौकशीत ती मतपत्रिका मुंबई पोलिस दलातील पोलीस कॉन्स्टेबल गणेश अशोक शिंदेची असल्याचे स्पष्ट होताच, त्याच्याविरुद्ध खात्या अंतर्गत निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

शिंदे हे बीडमधील आष्टी विधानसभेचे मतदार आहे. या मतदार संघातील मतपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या तक्रारी निवडणूक आयोगाकडे आल्या. त्यांनी गोपनीयरीत्या केलेल्या चौकशीत उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे, ही टपाली मतपत्रिका मुंबईतील मलबार हिल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अर्जानुसार पाठवण्यात आल्याचे समोर आले. त्यानुसार केलेल्या चौकशीत ही मतपत्रिका मुंबई पोलीस दलातील पोलिस कॉन्स्टेबल गणेश शिंदे  यांची असल्याचे स्पष्ट झाले. त्यानुसार त्याला कॉल करून चौकशी करताच तो सध्या पोलिस कॉन्स्टेबल म्हणून ताडदेव सशस्त्र पोलीस दल येथे कार्यरत असल्याचे सांगितले. १४ नोव्हेंबरला त्यांनी विल्सन कॉलेज येथे टपाली मतदान केले तेथेच मतपत्रिकेचा फोटो काढला आणि तो  गाव आष्टी येथील नातेवाईकांना व्हॉट्स ॲपवर पाठवल्याची कबुली दिली. पुढे, त्याच्या अन्य नातेवाईकांनी तो व्हायरल केल्याचे सांगितले.

कामकाजाची गोपनीयता भंग
निवडणूक कामकाजाची गोपनीयता भंग केली म्हणून त्यांच्यावर त्यांच्यावर नियमांनुसार फौजदारी तसेच प्रशासकीय कार्यवाही करण्यात यावी. तसेच, केलेल्या कारवाईचा अहवाल कार्यालयात तत्काळ पाठविण्यात यावा. जेणेकरून निवडणूक आयोगाला तो सादर करता येईल, असे आष्टी विधानसभेच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी मलबार हिल विधानसभेच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना शुक्रवारी पत्राद्वारे सांगितले आहे. त्यानुसार, मुंबई पोलिसांनी याबाबत तत्काळ दखल घेत शिंदेवर कारवाई करण्यात येत आहे.

मोबाईलकडे कर्मचाऱ्यांचेही दुर्लक्ष?

-  पोलिसांना टपाली मतदान करताना मोबाईल आतमध्ये नेण्यास निर्बंध आहे. पोलिसांना नियम माहिती असतात म्हणून मतदान केंद्रातील कर्मचाऱ्यांनीही याकडे दुर्लक्ष केल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे 

- शिंदे विरुद्ध कायदेशीर आदेशाचे उल्लघन आणि मतदानाची गोपनीयता भंग केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच खात्या अंतर्गत निलंबनाची कारवाई करण्यात येत असल्याचे समजते आहे.

Web Title: Viralization of Ballot Paper Costs Police Action of suspension

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.