‘विरार-अलिबाग’चे पाऊल पुढे; वन मंत्रालयाची मागितली परवानगी : नवघर ते चिरनेरचा पहिला टप्पा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2022 07:37 AM2022-10-13T07:37:04+5:302022-10-13T07:37:32+5:30

हा मार्ग नवघर नजीकच्या नागरपासून सुरू होणार आहे. चिरनेरपर्यंतच्या या मल्टिमॉडेल कॉरिडॉरसाठी पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील खारफुटीस वनजमीन लागणार आहे.

'Virar-Alibag' step forward; Permission sought from Ministry of Forests: First phase from Navghar to Chirner | ‘विरार-अलिबाग’चे पाऊल पुढे; वन मंत्रालयाची मागितली परवानगी : नवघर ते चिरनेरचा पहिला टप्पा

‘विरार-अलिबाग’चे पाऊल पुढे; वन मंत्रालयाची मागितली परवानगी : नवघर ते चिरनेरचा पहिला टप्पा

googlenewsNext

- नारायण जाधव
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यांच्या विकासात मैलाचा दगड ठरणाऱ्या बहुचर्चित विरार-अलिबाग मल्टिमॉडेल कॉरिडॉरच्या पहिल्या टप्प्यातील नवघर ते चिरनेर या ८० किमीच्या मार्गासाठी वने आणि पर्यावरण मंत्रालयाची परवानगी अखेर रस्ते विकास मंडळाने मागितली आहे. ती मिळाल्यास या मार्गाच्या बांधणीतील मोठा अडसर दूर होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

हा मार्ग नवघर नजीकच्या नागरपासून सुरू होणार आहे. चिरनेरपर्यंतच्या या मल्टिमॉडेल कॉरिडॉरसाठी पालघर, ठाणे आणि रायगड जिल्ह्यातील खारफुटीस वनजमीन लागणार आहे. एमएसआरडीसीच्या प्राथमिक मूल्यांकनानुसार, प्रकल्पात सुमारे ५,१३५ झाडे प्रभावित होणार आहेत. तुंगारेश्वरसह कर्नाळा, फणसाड या अभयारण्यांना त्याचा फटका बसणार आहे. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाला सादर केलेल्या प्रस्तावानुसार, पालघरमधून एकूण ३३.२७८ हेक्टर वनक्षेत्र, ठाण्यातून ९९.८८ हेक्टर आणि रायगडमधून ७२ हजार ६५४ हेक्टर वनक्षेत्र या प्रकल्पात बाधित होणार आहे.

अनेक महामार्ग एकमेकांना जोडले जाणार
हा कॉरिडॉर एमएमआरडीएकडून एमएसआरडीसीकडे सोपविल्याने महामंडळास तो समृद्धी महामार्गासह प्रस्तावित कोकण एक्स्प्रेस वे सह जेएनपीटीला जोडता येणे सोपे झाले आहे. सध्या समृद्धी महामार्गाची जेएनपीटीला जोडणी नसल्याने एमएसआरडीसीला मुंबई-वडोदरा महामार्गावर अवलंबून राहावे लागत आहे. 

कॉरिडॉर हा दोन टप्प्यांत विकसित होणार आहे. पहिला टप्पा हा विरारजवळच्या नवघर ते उरणनजीकच्या बलावली आणि दुसऱ्या टप्प्यात बलावली ते अलिबाग असा होणार असून तो समृद्धी आणि कोकण एक्स्प्रेस वेला जोडणार आहे. मुंबई-अहमदाबाद, मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे, जेएनपीटी ते मुंबई-गोवा-पुणे यांना जोडणारा एनच-४ बी याला जोडण्यात येणार आहे.

असा असेल कॉरिडॉर
८० किमी लांबीच्या कॉरिडॉरचा प्रारंभ बिंदू वसईतील बापाणे गावात असून शेवटचा बिंदू उरणमधील चिरनेर आहे. हा कॉरिडॉर मुंबई-अहमदाबाद महामार्गालाही जोडण्यात येणार आहे. यामध्ये आठ इंटरचेंज, २८ वाहन अंडरपास, १६ पादचारी अंडरपास आणि १२०  कल्व्हर्ट असतील. 

या महानगरांना  फायदा
हा मार्ग पूर्ण झाल्यावर परिसरातील ग्रोथ सेंटर, एमआयडीसी आणि वसई-विरार, ठाणे, कल्याण-डोंबिवली, भिवंडी, नवी मुंबई, उरण-पनवेल या महानगरांसह जवाहरलाल नेहरू 
पोर्ट, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळास त्याचा मोठा लाभ होणार असून येथील प्रवासी आणि अवजड वाहतूक वेगवान होण्यास मदत होणार आहे.

Web Title: 'Virar-Alibag' step forward; Permission sought from Ministry of Forests: First phase from Navghar to Chirner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.