विरार-पालघर अंतर घटणार; एमएमआरडीएकडून १,७०० कोटींच्या प्रकल्पांची कामे हाती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2024 09:38 AM2024-07-13T09:38:02+5:302024-07-13T09:38:18+5:30

एमएमआरडीएकडून वसई ते पालघरदरम्यान नारिंगी खाडीवर पुलाची उभारणी केली जाणार आहे.

Virar Palghar distance will decrease 1700 crore worth of projects undertaken by MMRDA | विरार-पालघर अंतर घटणार; एमएमआरडीएकडून १,७०० कोटींच्या प्रकल्पांची कामे हाती

विरार-पालघर अंतर घटणार; एमएमआरडीएकडून १,७०० कोटींच्या प्रकल्पांची कामे हाती

मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाची पालघरमधील हद्दवाढ जाहीर होताच या भागातील दळणवळणाला चालना देण्यासाठी तब्बल १,७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांची कामे एमएमआरडीएने हाती घेतली आहेत. त्याचबरोबर एमएमआरडीएकडून वसई ते पालघरदरम्यान नारिंगी खाडीवर पुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यामुळे विरार-पालघरमधील अंतर घटणार आहे.

दरम्यान, वैतरणा नदीवर पूल, सातपाटी जेटीदरम्यान खाडीपूल आणि मनोर ते वाडा, कांचड फाटा ते कुडूस डांबरीकरणाची कामे हाती घेण्यात आली आहेत. वसई ते पालघरदरम्यान नारिंगी खाडीवर पुलाची उभारणी केली जाणार आहे. यासाठी ४.५६ किमी लांबीच्या खाडीपुलाची पोहोचमार्गासह उभारणी करण्याचे प्रस्तावित आहे. हा खाडी पूल १२ मीटर रुंदीचा आणि दोन पदरी असेल. तसेच पालघर ते विरारदरम्यान वैतरणा नदीवर ८०० मीटर लांबीचा आणि १२ मीटर रुंदीच्या दोनपदरी पुलाची उभारणी केली जाणार आहे.

पालघरमधील दहिसर फाटा ते राष्ट्रीय महामार्ग ४८ या रस्त्यादरम्यान वैतरणा नदी असून, सध्या या नदीवर एक छोटा एकपदरी 3 मीटर रुंदीचा पूल आहे. सध्या या पुलावरून एकावेळी एकच छोटेसे वाहन जाऊ शकते.

त्यामुळे या भागांत दोन पदरी पुलाची आवश्यकता आहे. यातून मुंबई ते पालघर या प्रवासाच्या अंतराची जवळपास ४० ते ५० मिनिटांची बचत होणार आहे. त्यातून स्थानिक गावांना जोडण्यासाठी या पुलावरून एसटीही धावू शकणार आहे. त्यामुळे हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

निविदा केल्या जारी

मनोर ते वाडा आणि कांचड फाटा ते कुडूस या भिवंडीला जोडणाऱ्या मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यातून या मार्गावरील ४५ किमी लांबीच्या रस्त्यांचे डांबरीकरण एमएमआरडीएकडून केले जाणार आहे, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
एमएमआरडीएकडून या प्रकल्पांसाठी निविदा जारी करण्यात आल्या आहेत.

३० किमीचा रस्ता २० मिनिटांत होणार पार

मुरबे गाव ते पालघर हे अंतर सातपाटी र्जेटीदरम्यानच्या खाडीच्या दोन बाजूंना आहे. या भागाला जोडणी नसल्याने मुरबे परिसरातील नागरिकांना शिक्षण, नोकरीसाठी ३० किमीचा वळसा घालून यावे लागते. त्यासाठी १ तासाहून अधिक वेळ लागतो. एमएमआरडीएकडून येथे पोहोचमार्गासह ३ किमी लांबीच्या दुपदरी खाडीपुलाची उभारणी केली जाणार आहे. त्यातून मुरबेवासीयांना पालघरला १५ ते २० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार आहे. त्यातून प्रवासाच्या वेळेत ५० ते ६० मिनिटांची बचत होईल. लवकरच कंत्राटदारांची नियुक्ती करून या प्रकल्पांची कामे सुरू केली जाणार आहेत, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

...अशी आहे प्रकल्पांची किंमत 

वसई ते पालघरदरम्यान नारिंगी खाडी पूल - ८५७.८५ कोटी
मुरबे गाव आणि सातपाटी जेटीदरम्यान खाडीवर पूल - ४८५.५० कोटी
मनोर ते वाडा कांचड फाटा ते कुडूस रस्त्याचे डांबरीकरण - २२० कोटी
पालघर ते विरार-वैतरणा नदीवरील पूल - १२८ कोटी

Web Title: Virar Palghar distance will decrease 1700 crore worth of projects undertaken by MMRDA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.