१ जुलैला आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबई महापालिकेवर विराट मोर्चा; उद्धव ठाकरेंची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2023 03:09 PM2023-06-20T15:09:50+5:302023-06-20T15:17:21+5:30
१ वर्ष झाला जर मुंबई महापालिकेत घोटाळा झालाय मग गप्प का? तुम्ही चोरी करताय, दिवसाढवळ्या करतायेत म्हणून आम्ही मुंबई महापालिकेवर मोर्चा काढतोय असं उद्धव ठाकरे म्हणाले.
मुंबई - मुंबई महापालिका विसर्जित झालीय, १ वर्ष झाले, पावसाप्रमाणे निवडणुका लांबत चाललेत, निवडणुका घेण्याची हिंमत बेकायदेशीर सरकारमध्ये नाही. लोकांची कामे होत नाहीत, पैसा उधळला जातोय त्याला जाब विचारायला कुणीच नाही. महापालिका असताना लोकप्रतिनिधी असतात. स्थायी समितीत चर्चा होते त्यानंतर कामे दिली जातात. परंतु रस्त्याच्या नावाने, जी-२० नावाने सध्या वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. मुंबईला सध्या मायबाप राहिले नाही. लुटालूट सुरू आहे. या महापालिकेतील भ्रष्टाचाराला वाचा फोडण्यासाठी जाब विचारण्यासाठी येत्या १ जुलै शिवसेना महापालिकेवर विराट मोर्चा काढणार आहेत. या मोर्चाचे नेतृत्व शिवसेना नेते आदित्य ठाकरे करतील अशी माहिती ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, लोकांच्या मनात खदखद आहे. एकेकाळी मुंबई महापालिका साडे सहा कोटी त्रुटीत होती. परंतु शिवसेनेच्या हाती महापालिका आल्यानंतर ९२ हजार कोटी ठेवीपर्यंत तिजोरी भरली. आमच्या कारभाराने त्यात भर पडली. ठेवींमधूनच कोस्टल रोड आणि जनतेच्या उपयोगी कामे, योजना महापालिका पार पाडत होती. आता बेधडकपणे महापालिकेचा पैसा वापरला जातोय. माझ्या माहितीप्रमाणे जवळपास ७-९ हजार कोटी रुपये या ठेवींमधून आतापर्यंत वापरण्यात आला आहे. हा जनतेचा पैसा आहे. या पैशाची लूट त्याचे उत्तर त्यांना द्यावेच लागेल. त्यासाठी १ जुलैला मुंबई महापालिकेवर हा विराट मोर्चा काढण्यात येणार आहे. मुंबईकरांच्या मनातील असंतोषाचे प्रतिक म्हणून हा मोर्चा असेल असंही त्यांनी म्हटलं.
तसेच चोराच्या उलट्या बोंबा आहेत. अडीच वर्षाच्या काळात ९२ हजार कोटी ठेवी राहिल्या आहेत. कोरोना काळात टेंडरविना कुठल्या गोष्टी झाल्या नाहीत. महापालिकेच्या खर्चावर सगळ्यांचे लक्ष होते. त्यात कुठेही भ्रष्टाचार झाला नाही. गद्दार कितीही झाले तरी गद्दारच राहणार आहे. लोकांच्या मनात असंतोष उफाळतोय. त्यांनी कितीही म्हटलं तरी कपाळावरील गद्दारीचा शिक्का जाणार नाही असा टोला ठाकरेंनी शिंदे आणि समर्थक आमदारांना लगावला.
दरम्यान, १ वर्ष झाला जर मुंबई महापालिकेत घोटाळा झालाय मग गप्प का? तुम्ही चोरी करताय, दिवसाढवळ्या करतायेत म्हणून आम्ही मुंबई महापालिकेवर मोर्चा काढतोय. यात जे जे मुंबईप्रेमी आहेत त्यांनी सहभागी व्हावे. मुंबईकरांच्या कष्टाचा पैसा लुटला जातोय, मुंबईची तिजोरी रिकामी करायची आणि मुंबईला भिकेचा कटोरा घेऊन दिल्ली दरबारी उभं करायचे हे कटकारस्थान आहे असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी भाजपा-शिवसेनेवर केला.