मुंबई - राज्यात सुरु असणाऱ्या मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने मराठी भाषा विभाग आणि भाषा संचालनालयाने आभासी मराठी साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे. हे संमेलन भाषा संचालनालयाच्या युट्युब वाहिनीवर थेट प्रसारित होणार आहे. या संमेलनाचे अध्यक्ष मराठी कादंबरीकार कृष्णात खोत असून उद्घाटक म्हणून माजी संमेलनाध्यक्ष डॉ.लक्ष्मीकांत देशमुख असणार आहेत.
या संमेलनात बोलीभाषा कवी संमेलन असणार आहे. यात मालणीसाठी महेश केळुसकर, बंजारा भाषेतील वीरा राठोड, दख्खनीमधील डी के शेख, पावरा भाषेतील संतोष पावरा, अहिराणी भाषेसाठी तुषार पाटील, तावडी भाषेसाठी गोपीचंद धनगर, डांगी भाषेसाठी योगेश महाले, भिल्लीसाठी सुनील गायकवाड, वाघरी भाषेसाठी प्रवीण पावर आणि आगरी भाषेसाठी राजश्री भंडारी यांचा सहभाग असणार आहे.
याखेरीस, संमेलनात मी आणि माझं लेखन या परिसंवादत युवा साहित्य अकादमी विजेते विशाखा विश्वनाथ आणि प्रणव सखदेव सहभागी होती. तर विशेष व्याख्यान वाड्मयीन संस्कृती यासाठी अध्यक्षस्थानी डॉ. रणधीर शिंदे आणि वक्ते प्रवीण बांदेकर असणार आहेत. समारोपाचे विशेष व्याख्यान साहित्य आणि कलेचा धर्म या विषयावर असणार आहे. यात ज्येष्ठ साहित्यिक गौतमीपुत्र कांबळे सहभागी होतील. तर समारोपीय मनोगत डॉ.लक्ष्मीकांत देशमुख मांडणार आहोत.