निकेत पावसकरतळेरे : मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनचे संचालक तथा तळेरेचे सुपुत्र विशाल कडणे हे स्वतःच्या पदरचे पैसे मोडून रुग्णांसाठी गेली २ वर्षे मोफत मास्क, ऑक्सिमीटरचे वाटप करत आहेत. स्वतःच्या उच्च शिक्षणासाठी ठेवलेले पैसे त्यांनी कोव्हीड रुग्नांसाठी मोफत ऑक्सिजन काँसंट्रेटरचे वाटप करण्यासाठी खर्च केले आणि गेल्या २ वर्षात त्यांनी १०० हुन अधिक कोविड रुग्णांना जीवनदान दिले. त्यांच्या या निस्वार्थी कार्याची दखल लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सकडून घेतली गेली.
विशाल कडणे आणि सहकारी यांनी सामाजिक जबाबदारी जपत एक कर्तव्य म्हणून स्वखर्चाने जितके शक्य होईल तितकी जबाबदारी उचलण्याचे ठरवले. त्यानुसार आपल्या विभागामधील गरजू व्यक्तींची, गरजू संस्थांची यादी सामाजिक संस्थांकडून घेऊन तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार गरजू व्यक्तींना व संस्थांना मोफत ऑक्सिमीटर देण्याचे काम गेल्या चार महिन्यांपासून करत आहेत.
हे सर्वजण सुशिक्षित तरुण मंडळी असून दिवसभर आपला नोकरी धंदा सांभाळायचा आणि संध्याकाळी ऑक्सिमीटर, ऑक्सिजन काँसंट्रेटर वाटप करायचे असा त्यांचा नित्य उपक्रम सुरु आहे. या उपक्रमासाठी डॉ. प्रमोद जाधव, डॉ. गिरीश पिंगळे, डॉ. शशांक, चेतन वैद्य, गौरव पोतदार, अश्विन तर्पे, शीतल भुवड, पंकज चावरे या कोरोना योद्ध्यांचे महत्वपूर्ण योगदान लाभत आहे.
शिक्षणाने सिव्हिल इंजिनिअर असलेले विशाल कडणे हे गेले १ वर्ष सातत्याने कोव्हीड रुग्णांची सेवा करत आहेत. अनेक गरजू रुग्णांना त्यांनी ऑक्सिजन कमतरता असताना त्यांनी स्वखर्चाने ऑक्सिजन काँसंट्रेटर उपलब्ध करून दिले. त्यांच्या ह्या कार्याबद्दल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव, आमदार यामिनी जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करून कौतुक केले होते. विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी विशाल कडणे यांचे अभिमानास्पद कार्याबद्दल अभिनंदन केले.
'विशाल' कार्य समाजाच्या सर्व घटकांनी एकत्र येऊन कोरोनाच्या महामारीचा सामना करायला हवा असे विशाल कडणे सांगतात. यथाशक्ती प्रत्येकाने कोव्हीड रुग्णांची सेवा करायला हवी आणि सुरुवात स्वतः पासून व्हावी म्हणूनच मोफत ऑक्सिजन काँसंट्रेटरची सेवा सुरु असल्याचे सांगितले. आजपर्यंत खडतर परिस्थितीमधून मार्ग काढत असताना विशाल कडणे यांनी मुंबई, सिधुदुर्ग, सातारा, कराड, विटा इत्यादी ठिकाणी स्वखर्चाने ह्या मशीन पोहोचवल्या आहेत. ह्या सत्कार्यामध्ये विशाल यांचे सर्व कुटुंब सहभागी असून त्यांचे आई वडील सौ जयश्री व विजय कडणे यांची प्रेरणा आणि पत्नी सुखदा यांचे मोलाचे सहकार्य असल्याचे ते सांगतात.
त्यांनी यापूर्वी ५००० मास्कचे मोफत वाटप विभागामध्ये केले आहे. कोरोना रुग्नांप्रती असलेली आस्था आणि कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाचे चालू असलेले प्रयत्न याला कुठेतरी सुशिक्षित तरुणांचा हातभार लावावा ह्या प्रामाणिक अपेक्षेने हा उपक्रम हाती घेतल्याचे विशाल कडणे सांगतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावर वर्ल्ड बुक्स ऑफ रेकॉर्ड्स तर्फे विशाल कडणे यांच्या या 'विशाल' कार्याची दखल घेऊन सन्मान झाल्याने समाजाच्या सर्व स्तरातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. लंडनच्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्सचे युरोपचे प्रमुख विल्हेम जेझलर यांनी विशाल कडणे यांना सर्टिफिकेट ऑफ कमिटमेंट प्रमाणपत्र प्रदान करून वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स तर्फे विशाल यांच्या कार्याचा सन्मान केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेतली गेलेला विशाल कडणे हा वयाने सर्वात तरुण असून लंडन येथील विम्ब्लये ब्रेंट महापालिकेचे महापौर भगवानजी चोहान यांनी स्वतः फोन करून विशालचे अभिनंदन केले.