मुंबई : तृप्ती सावंत यांच्या बंडखोरीचा मोठा फटका शिवसेनेला वांद्रे पूर्व मतदारसंघात बसला. महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांचा पराभव होऊन येथे काँग्रेसचे झीशान सिद्दीकी निवडून आले. मात्र, आमदारकीची संधी हुकल्यानंतर महाडेश्वरांना आता महापौर पदावरही पाणी सोडावे लागणार आहे. महापौरांचा कार्यकाळ संपल्यामुळे पुढच्या महिन्यात या पदासाठी निवडणूक होणार आहे.शिवसेनेचा हा बालेकिल्ला आहे. या मतदार संघात शिवसैनिक प्रकाश (बाळा) सावंत यांचे चांगले वजन होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना उमेदवारी मिळाली. एकदा त्या आमदारपदी निवडून आल्या, तसेच २०१४ मध्ये माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा त्यांनी पराभव केला होता. मात्र, यावेळेस महापौर महाडेश्वर यांना तिकीट देण्यात आल्याने सावंत यांनी बंडखोरी केली. याचा मोठा फटका शिवसेनेला येथे बसला.शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या या मतदार संघात शिवसेनेचा पराभव झाला. त्यामुळे महापौरांचे आमदारकीचे स्वप्न भंग झाले. त्यांचा महापौरपदाचा अडीच वर्षांचा कार्यकाळही संपला आहे. तरी निवडणुकीच्या काळात महाडेश्वर यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली होती. ही मुदत संपत असल्याने पुढच्या महिन्यात या पदासाठी निवडणूक होणार आहे.
मातोश्रीच्या अंगणातील पराभवानंतर विश्वनाथ महाडेश्वर यांना सोडावे लागणार महापौरपद
By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2019 12:58 PM