Join us

Vishwas Nangare Patil : "ताजमध्ये बरोबर ११ मिनिटांनी मी..."; विश्वास नांगरे पाटलांनी सांगितलं २६/११ ला नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2024 8:01 PM

Vishwas Nangare Patil : विश्वास नांगरे पाटील यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा थरारक अनुभव सांगितला आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगितलं. 

सेंट झेवियर्स कॉलेजचा प्रसिद्ध 'मल्हार' फेस्टिव्हल मोठ्या जल्लोषात साजरा झाला. मल्हार म्हटलं की तरुणाईच्या आनंदाला उधाण येतं. मुंबईतल्या सर्वात मोठ्या फेस्टिव्हल असलेल्या मल्हारसाठी कॉलेजची मुलं आवर्जून वाट पाहत असतात. मल्हारमध्ये भन्नाट कार्यक्रमांची पर्वणी असते. अनेक दिग्गज कलाकार उपस्थित राहून मल्हारची शोभा वाढवतात. 'लोकमत' या फेस्टिव्हलचा मीडिया पार्टनर आहे. याच वेळी एका कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात केलं होतं. यामध्ये विश्वास नांगरे पाटील हे सहभागी झाले होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. 

विश्वास नांगरे पाटील हे भारतीय पोलीस सेवेतील एक लोकप्रिय अधिकारी आहेत. सध्या ते महाराष्ट्रातील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामध्ये अतिरिक्त पोलीस महासंचालक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते मुंबईचे सहपोलीस आयुक्त होते. त्याआधी ते नाशिक शहराचे पोलीस आयुक्त होते. या कॉन्क्लेव्ह दरम्यान त्यांनी २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यादरम्यानचा थरारक अनुभव सांगितला आहे. त्या रात्री नेमकं काय घडलं ते सांगितलं. 

"आमचे १८ शूर ऑफिसर शहीद झाले"

"२६ नोव्हेंबर २००८ रोजी लष्कर ए तोयबाचे दहशतवादी समुद्र मार्गाने मुंबईमध्ये आले. मुंबईमध्ये ताजसह पाच महत्त्वाच्या ठिकाणांना टार्गेट करण्यात आलं होतं. अनेक तास हे सर्व सुरू होतं. टॅक्सीमध्ये आईडी ब्लास्ट  करण्यात आले. रस्त्यावर अंदाधुंद गोळीबार करण्यात आला. १६६ लोकांना आपला जीव गमवावा लागला. अनेक जण गंभीर जखमी झाले. आमचे १८ शूर ऑफिसर शहीद झाले. मी दक्षिण मुंबईचा DCP होतो."

"दहशतवाद्यांवर गोळीबार केला"

"ताजमध्ये ९.४० ला चार दहशतवादी शिरले. दोन जण दुसऱ्या बाजूने आणि दोन जण मेन गेटने आतमध्ये घुसले. ९.५१ ला म्हणजेच बरोबर ११  मिनिटांनी मी आणि माझा बॉडीगार्ड अमित पोहोचलो. अमितला ३ गोळ्या लागल्या आहेत. आम्ही दहशतवाद्यांवर गोळीबार केला. त्यांनीही आम्हाला जोरदार प्रत्युत्तर दिलं. आम्ही सीसीटीव्ही कंट्रोल रूममध्ये गेलो. त्यानंतर शेकडो नागरिक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून असल्याचं समजलं."

"आमच्याकडे ऑटोमॅटिक वेपन्स नव्हते"

"आमच्याकडे ऑटोमॅटिक वेपन्स नव्हते. चार दहशतवाद्यांपैकी प्रत्येकाकडे AK47 , २०-२५ ग्रेनेड्स यांच्यासह अनेक अत्याधुनिक शस्त्रास्त्र होती. त्यामुळे मृत्यू अटळ आहे हे आम्हाला माहीत होतं. पण जीवन आणि मृत्यू यामागे कारण असतं. मी आणि माझ्या टीमने दहशतवाद्यांचा सामना केला. त्यासाठी आमचा गौरव देखील करण्यात आला" असं विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे. 

टॅग्स :विश्वास नांगरे-पाटील26/11 दहशतवादी हल्लामुंबईदहशतवादी हल्लादहशतवादी