'मल्हार' हा मुंबईतील सर्वात मोठा कॉलेज फेस्टिव्हल सध्या सुरू आहे. सेंट झेवियर्स कॉलेजच्या या प्रसिद्ध फेस्टिव्हमध्ये विद्यार्थ्यांसाठी भन्नाट कार्यक्रमांची पर्वणी असते. त्यांच्यासाठी हा एक आनंदोत्सव असतो. विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून, स्पर्धांमधून कलागुणांना वाव देण्याची संधी मिळते. मल्हारची यावर्षीची थीम आहे, 'विवा ला विदा' (Viva La Vida ) म्हणजेच Alive with Passion. याच दरम्यान त्यांनी एका कॉन्क्लेव्हचं आयोजन करण्यात केलं होतं. 'लोकमत' या फेस्टिव्हलचा मीडिया पार्टनर आहे. यामध्ये पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील, डॉ. राधाकृष्णन पिल्लई, डॉ. समीर पाटील आणि लोकप्रिय गायिका अनन्या बिर्ला यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांना मोलाचं मार्गदर्शन करून प्रोत्साहन दिलं.
विश्वास नांगरे पाटील हे भारतीय पोलीस सेवेतील एक लोकप्रिय अधिकारी आहेत. पाटील यांनी यशासाठी कसा खडतर प्रवास केला हे सांगितलं आहे. "काळ बदलतो. वेळ बदलते, पात्र बदलतात, भूमिका बदलतात. अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवा जेवढा मोठा संघर्ष, तेवढं मोठं यश" असं सांगत विद्यार्थ्यांना मोलाचं मार्गदर्शन केलं. 'येळकोट येळकोट जय मल्हार' असं म्हणत भाषणाला सुरुवात केली. "ऊर्जा आणि उत्साह म्हणजे मल्हार. तुम्ही मला इथे बोलावलत त्यासाठी मी तुमचा आभारी आहे. कोकरूड या एका छोट्याशा गावातून माझा हा प्रवास सुरू झाला. अनेक आव्हानं आली, संघर्ष केला आणि न डगमगता इथपर्यंतच प्रवास केला."
"सकारात्मक विचारामुळे मी माझं नशीब बदललं"
"माझ्या डोळ्यात स्वप्नं होती, त्यांना प्रयत्नांची आणि कष्टाची जोड दिली. मी माझ्या गावातील जिल्हापरिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेतलं. तालुक्याला जाऊन पुढचं शिक्षण घेतलं. शिक्षकांमुळे माझ्या आयुष्याला चांगलं वळण लागलं. सकारात्मक विचार आणि वागणुकीमुळे मी माझं नशीब बदललं. मी दहावीत असताना पेइंग गेस्ट म्हणून माझ्या शिक्षकांच्या घरी राहायचो. अभ्यास करण्यासाठी ते मला तीन वाजता रोज उठवायचे. जर तुम्ही फोकस्ड असाल तर तुम्ही शिकाल. तुम्ही शिकलात तर तुम्ही मोठे व्हाल आणि तुम्ही मोठे झालात तरच तुम्ही एन्जॉय कराल. हीच शिस्त, उद्दिष्ट याचा मला दहावीत खूप फायदा झाला. १९८८ मध्ये ८८ टक्के मिळाले आणि माझ्या तालुक्यात मी पाहिलं आलो."
"प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही"
"मी बारावीत असताना माझं ध्येय ठरवलं होतं. मी आर्टस् घेऊन IAS किंवा IPS होण्याचा निर्णय घेतला. यात माझ्या वडिलांनी खूप मोठी साथ दिली. ते नेहमीच सोबत राहिले. ते शेतकरी होते. माझ्यासाठी त्यांनी नेहमीच खूप मोठा त्याग केला. ध्येयाचा शोध घेताना अनेकदा ब्रेक लागायचा. ठेच लागायची. अनेकदा दोरी तुटलेल्या पतंगासारखी स्थिती व्हायची. नकारात्मक विचारांपासून मी लांब राहिलो. माझा एकाच मंत्रावर विश्वास आहे तो म्हणजे 'कठोर परिश्रम' (Hard Work). प्रयत्न करणाऱ्यांची कधीच हार होत नाही."
"काही जण रेकॉर्ड ब्रेक करतात"
"अपयश आलं तर ते एक आव्हान म्हणून स्वीकारा आणि काय कमतरता राहिली याचा नीट विचार करा आणि विजय होईपर्यंत प्रयत्न करा. एक काळ होता जेव्हा राईस प्लेटसाठी माझ्याकडे १५ रुपये नव्हते. यशोधनमध्ये सर्व्हंट क्वाटर्समध्ये राहायला रुम मिळाली नाही. क्लबमध्ये काय असेल याचं कुतुहल वाटायचं. क्लब फक्त बाहेरून पाहायचो. मेट्रो थिएटरबाहेर बॉलिवूड सेलिब्रेटींची एक झलक पाहण्यासाठी उभं राहायचो. विपरित परिस्थितीत काही जण तुटतात तर काही जण रेकॉर्ड ब्रेक करतात."
"माझं आयुष बदललं"
"मी खूप अभ्यास केला आणि IPS झालो. त्यानंतर माझं आयुष बदललं. मी DCP झाल्यावर मला यशोधन बिल्डिंगमध्येच फ्लॅट मिळाला. क्लबची मला आणि माझ्या कुटुंबाला मेंबरशिप मिळाली. बॉलिवूड सेलिब्रेटी माझी अपॉईंटमेंट घेऊन मला भेटायला यायचे. ताज हॉटेलमध्ये २६/११ चा दहशतवादी हल्ला झाला. मी आणि माझ्या टीमने दहशतवाद्यांचा सामना केला. त्यासाठी आमचा गौरव देखील करण्यात आला. काळ बदलतो. वेळ बदलते, पात्र बदलतात, भूमिका बदलतात. अविरत संघर्ष करण्याची तयारी ठेवा जेवढा मोठा संघर्ष तेवढ मोठं यश मिळतं" असं देखील विश्वास नांगरे पाटील यांनी म्हटलं आहे.