मुंबई - राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील अनेक मंत्र्यांवर भाजपा नेते किरीट सोमय्यांनीभ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. काही दिवसांपूर्वी कोल्हापूर येथे जाऊन ग्रामविकासमंत्री हसन मुश्रिफ यांच्यावर सव्वाशे कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तर, रत्नागिरीतील एका रिसॉर्टप्रकरणात मंत्री अनिल परब यांचेही नाव घेतले होते. आता, किरीट सोमय्या यांनी पोलीस दलातील कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विश्वास नांगरे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे.
विश्वास नांगरे पाटील हे महाविकास आघाडी सरकारचे माफिया म्हणून काम करतात, असा आरोप सोमय्या यांनी केला आहे. विश्वास नांगरे पाटील यांनी मला बेकायदेशीरित्या घरात कोंडून ठेवलं, तिथल्या पोलिसांना ते सूचना देत होते. याबाबत, राष्ट्रीय मानवाधिकार यांच्याकडे आपण तक्रार केल्याचेही सोमय्या यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले आहे. दरम्यान, नांगरे पाटील हे सध्या मुंबईचे सहपोलीस आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्यासंदर्भातच त्यांनी दिल्लीत जाऊन केंद्रीय ग्रामविकासमंत्र्यांची भेट घेतली. तसेच, इन्कम टॅक्स विभाग, ईडी यांसह इतरही अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. त्यानुसार, आता गतीने तपास सुरू असल्याचे सोमय्यांनी म्हटले.
मानहानी दाव्याबाबत सोमय्यांना समन्स
परिवहन मंत्री अनिल परब यांनी दाखल केलेल्या मानहानी दाव्यावरील सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाने भाजप नेते किरीट सोमय्यांना समन्स बजावले. सोमय्या यांनी २३ डिसेंबर रोजी या दाव्यावरील सुनावणीस स्वतः हजर राहावे किंवा वकिलांना हजर करावे, असे न्यायालयाने नमूद केले आहे. सोमय्या हेतुपूर्वक बदनामी करीत असल्याचा आरोप करीत शिवसेना नेते व परिवहन मंत्री अनिल परब यांनी उच्च न्यायालयात १०० कोटी रुपयांचा मानहानी दावा दाखल केला आहे.
रिसॉर्टबाबतचे प्रकरण
रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील रिसॉर्ट बांधकामाबाबत झालेल्या घोटाळ्यात अनिल परब यांचा हात असल्याचा आरोप सातत्याने सोमय्या सोशल मीडियाद्वारे करीत आहेत. मे २०२१ पासून ते अशा प्रकारच्या बदनामीकारक पोस्ट करीत असल्याचे परब यांनी म्हटले आहे.