मांडूळ तस्करीच्या व्यवहारातून ‘दृश्यम’ स्टाईल हत्या
By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2019 03:57 AM2019-08-08T03:57:31+5:302019-08-08T06:27:15+5:30
पोलिसांनी शिताफीने केली अटक; मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून दाढी, केस कापले
मुंबई : मांडूळ तस्करीच्या व्यवहारातून झालेल्या हत्याकांडामागे ‘दृश्यम’ सिनेमातील घटनेची पुनरावृत्ती असल्याचे तपासात समोर आले. आरोपीने यापूर्वी अनेकदा ‘दृश्यम’ सिनेमा पाहिला होता. यातूनच त्याने, उदयभान पाल (३५) याच्या हत्येनंतर मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याचे दाढी, केस कापले. मृतदेह सापडू नये म्हणून तो कुंभार्ली येथील खोल दरीत फेकून दिला. पुढे, त्याचा मोबाइल दोन दिवस बंद ठेवून तो एका कंटेनरमध्ये फेकून दिला. त्यामुळे महिनाभर पोलीस मोबाइल लोकेशननुसारच चौकशी करत होते, असे तपासात उघड झाले.
घाटकोपर परिसरात राहणारा पाल हा १७ जून रोजी कामानिमित्त कराडला जातो, असे सांगून घराबाहेर पडला. तो नॉटरिचेबल झाल्याने, पत्नीने २३ जून रोजी घाटकोपर पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. त्यानुसार, पोलिसांनी हरविल्याची तक्रार नोंद करत तपास सुरू केला.
सुरुवातीला त्याच्या मोबाइलवरून पोलिसांनी शोध सुरूकेला. त्यात, १८ जूनला कराडमध्ये असणारा पाल हा कराडहून कोल्हापूरमार्गे कर्नाटकच्या सोंदत्ती, अरगट्टी आणि अन्य भागांत फिरल्याचे दिसून आले. तपास पथकांनी संबंधित ठिकाणे पिंजून काढली. मात्र, हाती काहीच लागले नाही.
तपास सुरू असतानाच, जुलैच्या पहिल्या आठवड्यात पालचा मोबाइल अन्य सीमकार्डच्या आधारे सुरू झाल्याने, पोलिसांना तपासाची लिंक सापडली. त्यांनी त्यावरून केलेल्या तपासातून कळंबोलीतून एका व्यक्तीला ताब्यात घेतले. तो ट्रान्सपोर्ट व्यावसायिक होता. त्याने तो मोबाइल कंटेनरचालकाकडून घेतल्याचे सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी माणगावहून संबंधित चालकाला ताब्यात घेतले. तेव्हा, त्याने तो मोबाइल कंटेनरमध्ये सापडल्याचे सांगितले.
त्यामुळे दिशाभूल होत असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. तपासात, यातील अटक आरोपी प्रदीप सुर्वे आणि पालमधील अंतर्गत वादाबाबत पोलिसांना समजले. त्यांनी सुर्वेसह पाच जणांना ताब्यात घेत चौकशी केली. सुरुवातीला त्यांनी काहीही माहिती नसल्याचे सांगितले. पुढे, चौकशीत त्यांचा सहभाग स्पष्ट होताच त्यांच्यावर अटकेची कारवाई केली. तपासात, या मंडळींनीच पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी सारा खटाटोप केल्याचे स्पष्ट झाले. सुर्वेने यापूर्वी ‘दृश्यम’ सिनेमा अनेकदा पाहिला होता. त्यातूनच त्याने हत्येनंतर ही शक्कल लढवल्याचे सांगितले.
मृत मांडुळाचे घेतले १९ लाख
उदयभान पाल हा मांडूळ तस्करीत सक्रिय होता. दोन वर्षांपूर्वी ठाण्यातील एका पत्त्यांच्या क्लबमध्ये त्याची प्रदीप सुर्वेसोबत ओळख झाली होती. त्याने सुर्वेला मांडूळ तस्करीबाबत सांगितले. १९ लाखांत मांडुळ विकत घेतल्यास तेच मांडूळ अंधश्रद्धाळू लोकांना १ कोटीत विकून त्यातून ६० लाखांचा नफा मिळविण्याचे आमिष पालने दाखविले. त्यानुसार सुर्वेने यात पैसे गुंतवले. मात्र, सुर्वेने विकत घेतलेला मांडूळ काही तासांतच दगावला. यात फसवणूक झाल्यामुळे त्याचा राग त्याच्या मनात होता. यातूनच त्याने, नेहमीप्रमाणे पालला कराडला भेटायला बोलावले. तेथे दोघांमध्ये पैशांवरून वाद होताच त्याने साथीदारांसह त्याला मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला.