भाजपाकडे मुंबईसाठीचे व्हिजन - दरेकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2016 03:48 AM2016-10-29T03:48:07+5:302016-10-29T03:48:07+5:30
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडे मुंबईचे व्हीजन तयार आहे; आणि या माध्यमातूनच मेट्रोसह कोस्टल आणि उर्वरित वाहतूक प्रकल्पांना
मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाकडे मुंबईचे व्हीजन तयार आहे; आणि या माध्यमातूनच मेट्रोसह कोस्टल आणि उर्वरित वाहतूक प्रकल्पांना चालना देण्यात येत आहे. विशेष म्हणजे स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या विकासकामांकडे लक्ष ठेवत आहेत. याद्वारे मुंबईचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, असा विश्वास भारतीय जनता पक्षाचे विधानपरिषदेचे आमदार प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला. ‘लोकमत’ आयोजित व्यासपीठ अंतर्गत ‘लोकमत टीम’सोबत प्रवीण दरेकर यांनी विशेष संवाद साधला; यावेळी ते बोलत होते.
महापालिका निवडणुकीत शिवसेनेसोबत युती करणार का?
- शिवसेनेशी युती करायची की नाही? याबाबतचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील. युतीबाबत अद्याप संभ्रम असला तरी आम्ही महापालिकेत शंभर टक्के विजय संपादन करू, असा आम्हाला विश्वास आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वत: मुंबई महापालिका निवडणुकीवर लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्र्यांनी मुंबईचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवले आहे. रोडमॅप आखला आहे. त्यानुसार कामही सुरु झाले आहे. मुंबई मेट्रोचे काम सुरु झाले आहे. उर्वरित वाहतूक प्रकल्पांना चालना मिळाली आहे. महत्त्वाचे म्हणजे जेव्हा विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते; तेव्हाच्या सरकारने या संबंधात काही पाऊले उचलली होती. मात्र त्यानंतर सत्तेवर आलेल्या सरकारने विकासकामांबाबत काहीच पावले उचलली नाहीत. आता मुख्यमंत्र्यांनी स्वत: मुंबईच्या विकासावर लक्ष केंद्रीत केले आहे. आणि हीच आमची जमेची बाजू आहे.
निवडणुकीची रणनीती काय असेल?
- मुंबईचा मतदार उर्वरित शहरांपेक्षा वेगळा आहे. तो सजग आहे. दिवसभर कामानिमित्त फिरत असतानाच तो आपले स्वत:चे एक मत बनवतो असतो. त्यामुळे इथल्या मतदाराला स्वत:चे मत आहे. विचार करूनच तो स्वत:चे मत बनवतो. विचार करूनच मुंबईकर मतदानही करतात. विकास कामांचा विचार करता सद्यस्थितीमध्ये दक्षिण मुंबईतून सकाळी अथवा सायंकाळी दहिसरला जावयाचे झाल्यास किमान अडीच तास लागतात. ही वेळ मुंबई-पुणे प्रवासाची आहे. मात्र आमच्या सरकारने मेट्रोवर लक्ष केंद्रीत केल्याने हा प्रवास अर्ध्या तासांहून कमी अंतराचा होणार आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने काय पाऊले उचललीत?
- मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टीने सरकारने महत्त्वपूर्ण पाऊले उचलली आहेत. ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. आता तर आणखी सीसीटीव्ही बसवण्यावर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. याचा फायदा गुन्ह्यांची उकल करण्यासाठी होत आहे. केवळ सीसीटीव्ही नाही तर मुंबईच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारने उल्लेखनीय निर्णय घेतले आहेत.
मुंबईतील वनजमिनीचा प्रश्न बिकट आहे, तो कसा सोडवणार?
- पश्चिम उपनगरातील वनजमिनींचा मुद्दा महत्त्वाचा आहे. येथे कित्येक लोक कित्येक वर्षांपासून वास्तव्य करत आहेत. विशेषत: आरे कॉलनीसह उर्वरित ठिकाणी अद्यापही मुलभूत सेवा-सुविधा पोहचलेल्या नाहीत. पाणी आणि वीज अद्यापही येथील रहिवाशांना मिळालेली नाही. मात्र तेथे मुलभूत सेवा सुविधा मिळाव्यात म्हणून आम्ही प्रयत्नशील आहोत. महत्त्वाचे म्हणजे मी पाच वर्षे वनजमिनींचा मुद्दा अधिवेशनात मांडला आहे. वनजमिनींवरील रहिवाशांना वीज मिळावी म्हणून ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘पावर टू आॅल’ ही योजना येथे राबवण्यास मंजुरी दिली आहे. हे काम सुरु देखील झाले आहे.
भाजप सहकार चळवळ उदध्वस्त करत असल्याचा आरोप होतो...
- सहकार चळवळ उद्ध्वस्त व्हावी, असा आमच्या सरकारचा अजिबात विचार नाही. एका सहकार परिषदेला मुख्यमंत्री उपस्थित होते. तेव्हा सहकार चळवळीला उर्जितावस्था आणा; असे निर्देश दिले होते. सहकाराची ताकद आम्हाला माहीत आहे. ग्रामीण भागात सहकार चळवळीचे मोठे योगदान आहे. त्यामुळे सहकार चळवळ कदापि उद्ध्वस्त होणार नाही. आम्ही सहकारासोबत आहेत. सहकारात काही हेवेदावेही असतील. वैयक्तिक हेवेदावेही असतील. मात्र त्याचा फटका सहकार चळवळीला बसता कामा नये. आम्ही तो बसूही देणार नाही.
कृषी उत्पन्न बाजार समितीतील एजंटांसाखळी ठरवून संपवली जातेय...
- कृषी उत्पन्न बाजार समितीच्या रचनेत काही चुका होत्या. मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती बरखास्त करा, असे आम्ही कधीही म्हटले नाही. आमचे म्हणणे एवढेच होते की, शेतकरी वर्गाला न्याय मिळाला पाहिजे. शेतकरी वर्गाच्या उत्पादनाला बाजारपेठ मिळाली पाहिजे. दलालांचे वर्चस्व येथे असता कामा नये. अन्यथा शेतकरी वर्गाला न्याय मिळणार नाही. येथे राजकारण करणे हाही आमचा उद्देश नाही. दलालांची साखळी मोडीत काढणे आणि शेतकरी वर्गाला न्याय मिळवून देणे हा आमचा उद्देश आहे. मार्केटिंग स्ट्रक्चर उभे राहिले पाहिजे, असे आमचे म्हणणे आहे. आता दोन महिन्यांत येथील यासंबंधीचे सेटअप उभे राहत आहे.
अन्य पक्षातून भाजपात आलेल्यांना सामावून घेतले जाते?
- नक्कीच. माझ्यासोबत जे लोक भाजपात आले; त्यांच्यावर पक्षाने विश्वास दाखवला. पक्षाने त्यांना क्षमतेनुसार पदे देखील दिली. याचा अर्थ माझ्यावर पक्षाने विश्वास दाखवला. माझ्यासोबत आलेल्या प्रत्येकाला पक्षाला सामावून घेण्याचा प्रयत्न केला. सक्षम लोकांवर अन्याय होत नाही, हे यानिमित्ताने सिद्ध झाले आहे.
मुंबईत सगळ््या जागा भाजप लढवणार?
- मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत भाजपाने स्वबळावर लढावे, अशी प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे. सरतशेवटी मुंबई महापालिकेची निवडणूक लढताना पक्ष कार्यकर्त्यांची मते लक्षात घेतली जातील. २२७ जागा लढण्याबाबत पक्ष सकारात्मक असून, त्या पद्धतीनेच पक्षाची कामे सुरु आहेत.
राजकारण करताना तुमचा प्राधान्यक्रम कसा असतो?
- माझा पिंड हा पहिल्यापासूनच कार्यकर्त्याचा आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी तसे संस्कारच आमच्यावर केले आहेत. पहिल्यांदा समाजकारण आणि मग राजकारण हेच माझेही सूत्र आहे. पक्ष बदललेला असला तरी पहिल्यांदा समाजकारण आणि मग राजकारण; हाच आमचा मार्ग राहणार आहे.
शब्दांकन - सचिन लुंगसे