'व्हीजन'मध्ये एकाच व्यासपीठावर चित्र, शिल्प अन् ग्राफिक कलाकृतींचा मेळाकला रसिकांसाठी पर्वणी

By स्नेहा मोरे | Published: November 1, 2023 06:48 PM2023-11-01T18:48:47+5:302023-11-01T18:48:58+5:30

वरळी येथील नेहरु सेंटर कला दालनात एकाच व्यासपीठावर चित्र, शिल्प आणि ग्राफिक्स कलाकृतींचा समावेश असलेले व्हीजन समूह कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे.

Vision brings together paintings, sculptures and graphic works on a single platform for art lovers | 'व्हीजन'मध्ये एकाच व्यासपीठावर चित्र, शिल्प अन् ग्राफिक कलाकृतींचा मेळाकला रसिकांसाठी पर्वणी

'व्हीजन'मध्ये एकाच व्यासपीठावर चित्र, शिल्प अन् ग्राफिक कलाकृतींचा मेळाकला रसिकांसाठी पर्वणी

मुंबई - वरळी येथील नेहरु सेंटर कला दालनात एकाच व्यासपीठावर चित्र, शिल्प आणि ग्राफिक्स कलाकृतींचा समावेश असलेले व्हीजन समूह कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. कोलकाता येथील चार कलाकारांच्या एकत्रित प्रदर्शनात जीवनाची गुंतागुंत, स्त्रीत्वाच्या शक्तीची प्रचिती आणि मिनिमलिस्टिक शिल्पे ही कलेची अनोखी वैशिष्ट्ये आहेत.

कोलकाता येथील प्रसिद्ध कलाकार सुमन कुमार पॉल, अरुप कुमार दास, मृण्मय दास, अरुण पॉल, प्रदीप मंडोल आणि पार्थ प्रतिम गायन यांच्या कलाकृतींचा समावेश प्रदर्शनात आहे. चित्र, शिल्प, ग्राफिक्स अशा विविध कलाकृतींचे हे प्रदर्शन ६ नोव्हेंबरपर्यंत नेहरू सेंटर गॅलरी येथे हे प्रदर्शन सकाळी ११:०० ते संध्याकाळी ७:०० वाजेपर्यंत रसिकांसाठी विनामूल्य खुले राहील.

या प्रदर्शनात सुमन कुमार पॉल यांचे म्युरल माध्यमातील कलाकृती आहेत. म्युरल या माध्यमात काम करत असताना सुमन पॉल यांनी निमशहरी भागातील प्रश्न आणि तेथील जीवनाची गुंतागुंत यासारखे संवेदनशील विषय कलाकृतीतून मांडले आहेत. तेजस्वी आणि मिश्र रंगांचा वापर, आकारांमधील नाट्यमयता, विषयातील नाट्यमयता आणि लयबद्धता हे त्यांच्या कलाकृतींचे वैशिष्ट्य आहे. तर अरुप कुमार दास ऍबस्ट्रॅक्ट माध्यमात कलाकृती तयार करतात. स्थापत्य हे त्यांच्या कलाकृतीची प्रेरणा आहे. लयदार आणि जोरकस रेषा हे त्यांच्या चित्रातील महत्वाचा घटक आहे, स्त्रीत्वाच्या शक्तीची प्रचिती दास यांच्या लयदार रेषेतून येते.

मृणमय दास फॅब्रिक माध्यमात काम करतात. त्यांच्या कलाकृती ऍबस्ट्रॅक्ट असल्या तरी धाग्यांच्या वापरांमुळे कलाकृतीमध्ये लय तयार होते जी कलारसिकांसाठी नेत्रसुखद अनुभव देणारी ठरते . फॅब्रिक माध्यमात करण्यात येणाऱ्या डाईंग, स्टॅम्पिंग, स्क्रीन पैंटिंग, फॅब्रिक क्वील्टिंग अशा वैविध्यपूर्ण पद्धतीनी दास कलाकृती तयार करतात. अरुण पॉल यांनी चित्रांमध्ये प्रामुख्याने प्रतीकांचा वापर केला आहे. घन आकारातील पार्श्वभूमीवर ही प्रतीके विरोधाभासी पद्धतीने कॅनव्हासवर उठून दिसतात. पोत आणि विरोधाभासी रंगांचा वापर हे पॉल यांच्या चित्रांचे वैशिष्ट्य आहे. निसर्ग हा प्रदीप मोंडल यांच्या शिल्पांचा मुख्य घटक आहे. मिनिमलिस्टिक स्वरूपातील प्रदीप यांची शिल्पे ही निसर्गाशी एकरूपतेचा साधा आणि महत्वाचा संदेश देतात. पार्थ प्रतिम गायन यांची शिल्पे म्हणजे इतिहास आणि निसर्ग यांच्याबद्दल मूक संवाद साधणारे माध्यम होय.

Web Title: Vision brings together paintings, sculptures and graphic works on a single platform for art lovers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Mumbaiमुंबई