मुंबई : कोरोनाचा धोका दिवसागणिक वाढत असतानाच दुसरीकडे मुंबईकरांकडून माणसूकीचे दर्शन घडविले जात आहे. पोलीस, वाहतूक पोलीस, आपत्कालीन सेवा विभागाचे कर्मचारी यांना सॅनिटायझर्ससह मास्कचे वाटप केले जात असून, गरजू व्यक्तींना अन्नधान्याचे वाटपदेखील केले जात आहे. तर दुसरीकडे मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी देखील मुंबईकरांकडून निधी गोळा केला जात असून, यात शक्य तेवढया संख्येने मुंबईकर सहभागी होत आहेत.कोरोनाने उच्छाद मांडला असून, नागरिकांना या कोरोनारुपी राक्षसापासून बचाव करण्यासाठी मुंबईतील सर्व शासकीय यंत्रणा रात्रंदिवस झटत आहे. या यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांची सुरक्षा सुद्धा तेवढीच महत्त्वाची आहे. याची दखल घेत व सामाजिक जाणीव ठेवत फाईट फॉर राईट फाउंडेशनच्या वतीने मालाड पोलीस ठाणे, बांगुर नगर पोलीस ठाणे, वाहतूक विभाग व आपत्कालीन सेवेतील कर्मचारी यांना सॅनिटायझरचे वाटप केले. फाउंडेशनचे सचिव मंथन पाटील, गणेश परदेशी, मनोज वाढेर, सिद्धेश राणे, शिर्वटकर आणि सहकारी यांनी सॅनिटायझर वाटप केले.मालाड येथील धीरज कृष्णा को. ऑप हाऊसिंग सोसायटीच्या वेलफेअर फंडातून मुख्यमंत्री सहायता निधी कोविडसाठी दहा हजार रुपये मदत केल्याचे सचिव श्रीकांत कृष्णा बडद आणि अध्यक्ष हेमंत पालव यांनी सांगितले. दुसरीकडे विधिमंडळातील आमदारांचे स्वीय सहाय्यक देखील मुख्यमंत्री सहायता निधीसाठी मदत करत आहेत, असे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे स्वीय सहाय्यक राकेश नागनाथ पाटील यांनी सांगितले. निधी गोळा करण्यासाठी प्रतिनिधी नेमण्यात आले असून, अन्य सर्व पक्षीय आमदार-स्वीय सहाय्यक शिवसेना, कांग्रेस, राष्ट्रवादी, भाजपा असेही प्रतिनिधी नेमण्यात आले आहेत.राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीतर्फे आजघडीला सात लाखावर अन्नाचे वाटप करण्यात आले. ८ हजार ५०० कुटूंबियांना शिधावाटप करण्यात आले. साठ जणांनी टाटा रुग्णालयात दाखल होत रक्तदान केले. कुर्ला येथील भाभा हॉस्पिटलच्या सोळा नर्सेसची राहण्याची व त्यांना तिथून रुग्णालयात घेऊन जाणे व आणण्याची व्यवस्था केली आहे. पंचवीस डायलिसिस रुग्णांना वाहन उपलब्ध करून दिले. वीस ट्रक अन्नधान्य दिले. चाळीस किन्नरांना धान्य वाटप केले. या सर्व कामात संघाचे स्वयंसेवक अहोरात्र काम करत आहेत. समाजातील अनेक दानशूर व्यक्ती व सहयोगी संस्था यांचे मोलाचे सहकार्य या सेवा यज्ञात मिळत आहे, अशी माहिती कुर्ला येथील कार्यकर्ते किरण दामले यांनी दिली.