शाब्बास मुंबई पोलीस! अवघ्या ४८ तासांत घडवली दिव्यांग मुलाची कुटुंबासोबत भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2018 04:43 AM2018-07-24T04:43:28+5:302018-07-24T06:24:16+5:30

पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, विक्रोळीसह आजूबाजूचा संपूर्ण परिसर पिंजून काढला

Visit to Divya's family with the police in 48 hours | शाब्बास मुंबई पोलीस! अवघ्या ४८ तासांत घडवली दिव्यांग मुलाची कुटुंबासोबत भेट

शाब्बास मुंबई पोलीस! अवघ्या ४८ तासांत घडवली दिव्यांग मुलाची कुटुंबासोबत भेट

Next

मुंबई : आजीला भेटण्यासाठी आलेला १३ वर्षीय गतिमंद मुलगा अचानक गायब झाला. कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली. पोलिसांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेत, विक्रोळीसह आजूबाजूचा संपूर्ण परिसर पिंजून काढला आणि अवघ्या ४८ तासांतच या मुलाची त्याच्या कुटुंबीयांसोबत भेट घडवून आली.
घाटकोपर परिसरात १३ वर्षांचा दिव्यांग मुलगा आईवडील आणि दोन भावंडासोबत राहतो. विक्रोळी कन्नामवारनगर २ मध्ये त्याची आजी राहाते. गुरुवारी तो आईसोबत आजीकडे आला होता. मुलाला आजीकडे ठेवून आई घरी निघून गेली. रात्री घराबाहेर खेळत असताना अचानक तो गायब झाला. आजीने त्याचा शोध घेतला. परिसरातील मित्रांकडे विचारपूस केली. मात्र, त्याचा काहीच थांगपत्ता लागलेला नाही.
शुक्रवारी दुपारी त्यांनी विक्रोळी पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. या प्रकरणी अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला. विक्रोळी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक गवळी, सहायक पोलीस निरीक्षक एस.बी. कांबळे, पोलीस नाईक शिवा राजगुरू, वैष्णवी कोळंबकर यांनी तपास सुरू केला.
परिसरातील उद्यानांसह, सिनेमागृहे, मॉल, तसेच बाजारांमध्ये पोलीस त्याला शोधू लागले. सीसीटीव्ही तपासले. मात्र, मुलाबाबत माहिती हाती लागली नाही. तपास पथकाने रात्रीही रेल्वे स्थानक, बस स्थानके, तसेच निर्जन स्थळांवरही मुलाचा शोध घेतला. अखेर शनिवारी त्यांनी बालसुधारगृहात चौकशी केली. तेव्हा मानखुर्दच्या बालसुधारेगृहात त्यांनी केलेल्या वर्णनाच्या मुलाला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार, तपास पथकाने बालसुधारगृहात धाव घेतली. मुलाच्या कुटुंबीयांनाही बोलावून घेतले आणि मुलाचा शोध संपला. गुरुवारी रात्रीच कांजूर रेल्वे पोलिसांना तो फलाटावर रडताना आढळला. त्याच्याकडे विचारपूस केली. मात्र, त्याच्याकडून काहीच माहिती मिळाली नाही. अखेर ते शुक्रवारी त्याला बालसुधारगृहात सोडून आले होते.
विक्रोळी पोलिसांनी सोमवारी मुलाचा ताबा घेत, कुटुंबाच्या हवाली केले. मुलगा सुखरूप मिळाल्यामुळे कुटुंबीयांनी सुटकेचा निश्वास सोडला.

Web Title: Visit to Divya's family with the police in 48 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.