मुंबई : अवकाश निरीक्षणाची संधी सातत्याने मुंबईकरांना प्राप्त होत असतानाच शुक्रवारी रात्री ७.५८ ते ८.०५ या वेळेत मुंबईतील खगोल प्रेमींना आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक पाहण्याची संधी मिळाली. विशेषत: आकाश मोकळे असल्याने हे स्थानक पाहता आल्याचे मुंबईतल्या खगोल प्रेमींनी सांगितले. अवघ्या काही मिनिटांसाठी वरळीसह लगतच्या परिसरात या स्थानकाचे दर्शन घडल्याची माहिती वरळी येथील नेहरु विज्ञान केंद्रातून देण्यात आली.
एखादा तारा पुढे सरकतो त्या प्रमाणे हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक मोकळ्या आकाशात दिसले, असे खगोलप्रेमींनी सांगितले. मुळात अनेक देशांनी एकत्र येत याची निर्मिती केली आहे. त्यामुळे त्यास आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक असे संबोधले जात असल्याचे खगोलप्रेमींनी सांगितले. महत्त्वाचे म्हणजे ही घटना फार दुर्मिळ नाही. मात्र आजच्या दिवशी हे आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानक अगदी डोक्यावरून जाणार असल्याने ते पाहणे औत्सुक्याचे होते, असे देखील खगोलप्रेमींनी नमूद केले. मुंबई व्यतिरिक्त डोंबिवली येथेदेखील या स्थानकाचे दर्शन झाल्याची माहिती खगोलप्रेमींनी दिली.
दरम्यान, शून्य सावली दिवस; या दिवशी आपल्या सोबत वर्षभर राहणारी सावली आपल्याला काही मिनिटासाठी सोडून जाते. मुंबईत हा योग १५ मे रोजी येणार आहे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या अक्षवृत्तांवर वेगळे दिवस आणि वेळा आहेत. त्यामुळे सर्व शहरे आणि गावांच्या वेळात काही सेकंदांचा फरक आहे. त्यामुळे आपण दुपारी १२ ते १२.३५ ह्या वेळा दरम्यान सूर्य निरीक्षण करावे, असे खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी सांगितले.
................................................