मुंबई : इस्रायलचे मुंबईतील महावाणिज्यदूत (कौन्सिल जनरल) कोबी शोशानी यांनी बुधवारी ‘लोकमत’ कार्यालयास सदिच्छा भेट दिली. इस्रायल आणि भारतातील संबंधांसह विविध विषयांवर त्यांनी यावेळी भाष्य केले.
भारत आणि इस्रायलला समृद्ध असा ऐतिहासिक वारसा लाभला आहे. दोन्ही देशांत अनेक बाबतीत साम्य दिसून येते. विविधतेने नटलेल्या भारतीय संस्कृतीच्या मी विशेष प्रेमात आहे. नव्वदच्या दशकातील मुंबई आणि आताची मुंबई यात जमीन-अस्मानाचा फरक दिसून येतो. सी-लिंकसारख्या अनेक पायाभूत प्रकल्पांनी मुंबईच्या सौंदर्यात भर घातलीच आहे, शिवाय विकासासही हातभार लावला आहे, असे ते कौतुकाने म्हणाले.
मी मुंबईत अनेकवेळा आलो आहे. इथली प्रत्येक गोष्ट मला भुरळ पाडते. त्यामुळेच मला जेव्हा वाणिज्य दूत म्हणून क्षेत्र निवड करण्यास सांगण्यात आले, तेव्हा निसंकोचपणे मी मुंबईची निवड केली, असेही शोशानी यांनी सांगितले. भारतातील युवा वर्ग प्रचंड बुद्धिमान आहे. त्यांच्यात असाध्य ते साध्य करण्याची क्षमता आहे. त्यामुळे भारताचे भविष्य उज्ज्वल असल्याचे गौरवोद्गार त्यांनी काढले.
भारतीय सिनेसृष्टीचा मी मोठा चाहता आहे. अभिनेता अमिताभ बच्चन आणि विद्या बालन यांचे चित्रपट आवर्जून पाहतो, असे त्यांनी सांगितले. त्याचप्रमाणे भारत-इस्रायल यांच्यातील संबंध वृद्धिंगत करण्यासाठीच्या त्यांच्या योजना, पाण्याच्या पुनर्वापरासंबंधीचे धोरण, अफगाणिस्तानातील हिंसाचार यांसह विविध विषयांवर त्यांनी भाष्य केले.